जळगावातील न्यू बॉम्बे सुपर बेकरीवर धडक कारवाई अन्न व औषध प्रशासनाची छापेमारी : तीन लाख 31 हजारांचा साठा जप्त
Food and Drug Administration raids New Bombay Super Bakery in Jalgaon जळगाव (13 डिसेंबर 2024) : आगामी ख्रिसमस व नवीन वर्ष-2025 आगमनानिमित्त विशेष तपासणी मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने बेकरी तपासणी मोहीम तीव्र केलेली आहे. या मोहितेंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बुधवार 11 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता जळगावातील मेहरुण परिसरातील न्यू बॉम्बे सुपर बेकरी यांचा पेढीच्या तपासणी केल्यानंतर साठा करीत ठेवलेला मावा टोस्ट व पिस्ता टोस्टचा 2792 किग्रॅ वजनाचा एकूण तीन लाख 31 हजार 440 रुपयांचा साठा जप्त केला. विशेष म्हणजे या अन्न पदार्थावर पॅकींग तारीख तसेच बिलाचा उल्लेख नव्हता.
यांनी केली कारवाई
ही कारवाई ही अन्न सुरक्षा अधिकारी कि.आ.साळुंके व त्यांचे सहकारी अन्न् सुरक्षा अधिकारी के.एच.बाविस्कर, श.म.पवार यांनी अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाचे सहायक आयुक्त संतोष कृ.कांबळे व सहआयुक्त (नाशिक विभाग) म.ना.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

धडक कारवाई सुरूच राहणार
जळगाव जिल्हयात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत तपासण्या करण्यात येणार आहेत. स्वच्छ वातावरणात अन्न पदार्थ न तयार करणार्या पेढ्यांविरोधात तीव्र कारवाई करणार असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
हॉटेल्ससह केक उत्पादकांची तपासणी
जळगाव जिल्हयातील सर्व हॉटेल्स, केक उत्पादक व विक्रेते, बेकरी अन्न पदार्थ उत्पादक व विक्रेते अशा आस्थापनांची तपासणी केली जात आहे. या तपासणीत आस्थापनांच्या उलाढालीनुसार परवाना-नोंदणी केली आहे का?, कामगारांचे वैद्यकीय तपासणी अहवाल, अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरलेल्या पाण्याचे अहवाल, कर्मचार्यांना योग्य प्रशिक्षण दिले आहे का?, सर्वसाधारण स्वच्छता, त्याप्रमाणे मुदतबाह्य कच्चा माल व अन्नपदार्थांचा वापर होत आहे का? आदी बाबींची तपासणी केली जात आहे. याशिवाय बेकर्यांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेले तयार अन्नपदार्थ व अन्नपदार्थ बनविण्यासाठी वापरले जाणारे घटकपदार्थ रवा, पीठ, मैदा, तूप आदींचे नमुने यांची तपासणी करण्यात येत आहे.

