नंदुरबार एसीबीची मोठी कारवाई : 40 हजारांची लाच घेणार्या पोलीस पाटलासह खाजगी पंटरला ठोकल्या बेड्या
नंदुरबार (सोमवार, 21 सप्टेंबर 2026) : मुलाविरोधात पोलिसात तक्रार होवू न देण्यासाठी तसेच प्रकरण मिटवण्याच्या मोबदल्यात 40 हजारांची लाच स्वीकारताना पोलीस पाटील व एका खाजगी व्यक्तीला नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी नवापूर शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ पंचांसमक्ष करण्यात आली. बिलमांजरेतील पोलीस गिरीश नान्या मावची (52) व खाजगी पंटर कांतीलाल रूळजी गावीत (48, आमपाडा, ता.नवापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराचा मुलगा सायबर कॅफेत काम करतो व त्याची 23 वर्षीय विवाहितेशी ओळख झाल्यानंतर त्यांच्यात संपर्क वाढला मात्र ही बाब विवाहितेच्या पतीला कळताच त्यांच्यात वाद वाढला. त्यानंतर महिलेच्या पतीने तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याबाबत पोलीस पाटलाशी चर्चा केली. यावेळी दोन्ही संशयीतांनी तक्रारदाराला पोलिसात तक्रार होवू न देण्यासाठी व प्रकरण मिटवण्यासाठी 70 हजारांची लाच मागितली. त्यातील 30 हजार रुपये 29 ऑगस्टला स्वीकारले व उर्वरीत 40 हजारांची मागणी वाढल्यानंतर तक्रारदाराने नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवली.

नवापूरातून दोघांना केली अटक
लाच पडताळणीनंतर सोमवारी नवापूर शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ सापळा रचण्यात आला. संशयीत पोलीस पाटील गिरीश मावची याने खाजगी इसम कांतीलाल रुळजी गावीत यांच्या उपस्थितीत 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून असलेल्या पथकाने दोघांना अटक केली. या प्रकरणी नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
नंदुरबार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, विलास पाटील, हवालदार विजय ठाकरे, हवालदार संदीप खंडारे, हवालदार नरेंद्र पाटील, हवालदार जितेंद्र महाले, नाईक हेमंतकुमार महाले आदींच्या पथकाने यशस्वी केला.


