भेसळीचा संशय : धुळ्यानजीक लक्झरीतून 16.52 लाखांचा माव्याचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई ; 13 विविध कंपन्यांच्या माव्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी रवाना


धुळे (मंगळवार, 22 सप्टेंबर 2026) : अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाकडून धडक मोहिम राबवण्यात येत आहे. अहमदाबादहून अकोल्याकडे जाणार्‍या एका लक्झरीतून पाच हजार 385 किलो मावा (खवा) भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत 16 लाख 52 हजार 100 रुपये असल्याचे प्रशासनाने कळवले आहे. या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, अहमदाबादहून अकोल्याकडे अशोक लेलँड कंपनीच्या वेलकम लक्झरी बस क्रमांक (एम.पी.44 झेड.एफ.7214) मधून मिठाई तयार करण्यासाठी लागणार्‍या माव्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तसेच धुळे तालुका पोलिसांनी मंगळवारी सकाळी सुमारे 6 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील मोराणे हद्दीत साक्री रोडवरील हॉटेल बालाजीजवळ बस थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान बसमध्ये विविध कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात मावा आढळून आला. पुढील कारवाईसाठी संबंधित वाहन टोलनाक्याजवळील दिसान कोल्ड स्टोरेज येथे नेण्यात आले. तेथे माव्याच्या साठ्याची तपासणी करण्यात आली.

13 कंपन्यांच्या अन्न पदार्थांचे नमूने घेतले
या कारवाईत 13 विविध कंपन्यांच्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. यामध्ये प्रीमियम हलवा (ब्रजनिधी), प्रीमियम हलवा (गणेशा), इंडियन स्वीट हलवा (नंदी), स्वीट हलवा (खोडलं), हलवा (श्री ग्वाल), हलवा (श्री गोकुळ), स्वीट हलवा (गोपाल), ट्रॅडिशनल स्वीट (श्री ग्वाल), ट्रॅडिशनल स्वीट (श्री गोकुळ), इंडियन स्वीट (श्री गोपाल), कृष्णा हलवा, इंडियन डेझल्ट (नंदि) आणि प्रीमियम डेझल्ट (मीरा) या उत्पादनांचा समावेश आहे.

अन्न साठा कोल्ड स्टोरेजमध्ये सुरक्षित
भेसळीचा संशय असल्याने एकूण 5,385 किलो वजनाचा आणि 16 लाख 52 हजार 100 रुपये किमतीचा साठा जप्त करून कोल्ड स्टोरेजमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला आहे. संबंधित माव्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणात बसचालक जगदीश मानजी पाटीदार, महेंद्रसिंग परबतसिंग राठोड आणि क्लिनर राजकुमार रोशनलाल आचार्य (तिघेही रा.अहमदाबाद, गुजरात) यांचीही चौकशी करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त मंगेश माने (नाशिक), सहाय्यक आयुक्त (अन्न) गो. वी. माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, अरविंद राऊत, मंगेश भावसार यांनी केली. धुळे तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक खाकीदा सय्यद, सतीश कोठावदे, पंकज पाटील आदींनी सहकार्य केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !