सावद्यातील बनावट नोटा प्रकरण : भुसावळातील ‘आवेश’ पाच हजारांच्या बनावट नोटांसह जाळ्यात


सावदा (17 डिसेंबर 2024) : शंभर रुपये चलनाच्या 76 बनावट नोटा बाळगणार्‍या शेख आरीफ शेख फारुख व अझरखान अय्युब खान (ख्वाजा नगर, सावदा) यांना सावदा पोलिसांनी शुक्रवार, 13 रोजी अटक केली होती. या दोघांना बनावट नोटा विक्री करणारा तिसरा संशयीत आरोपी ‘आवेश’ या भुसावळ येथून अटक करण्यात आली. संशयीताला न्यायालयात हजर केले असता त्याला मंगळवार, 16 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीच्या अटकेनंतर त्याच्या घरातून पाच हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

पुन्हा पाच हजारांच्या बनावट नोटा जप्त
सावदा पोलिसांनी शहरातील ख्वाजा नगरातील शेख आरीफ शेख फारुख व अझरखान अय्युब खान या दोघांना बनावट चलनी नोटा बाळगल्या प्रकरणी 13 रोजी अटक केली होती. त्यांनी भुसावळ येथील आवेश (20, गौसिया नगर, भुसावळ) याच्याकडून खरे चार हजार रुपये देवून दहा हजारांच्या बनावट नोटा विकत घेतल्याची कबुली दिल्यानंतर आवेशला रविवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर चौकशीत त्याच्या घरातून शंभर दराच्या 50 नोटा जप्त करण्यात आल्याचे सहा.निरीक्षक विशाल पाटील यांनी सांगितले.

रॅकेटचा व्हावा पर्दाफाश
आरोपी आवेश हा रेल्वेत खाद्य पदार्थ विक्रीचे काम करतो त्यामुळे त्याने बनावट शंभर रुपये दराच्या नोटा कोणाकडून आणल्या, त्याच्या मागे आणखी कोण-कोण आहे मात्र मोठे रॅकेट कार्यरत आहे का याबाबत पोलीस कोठडीत सखोल चौकशी सुरू आहे. तपास तपास सावदा पोलीस स्टेशनचे सहा.निरीक्षक विशाल पाटील करीत आहेत.


कॉपी करू नका.