जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी चांगले विचार गरजेचे
अंतर्नाद पुष्पांजली प्रबोधनमाला : व्याख्याते प्रा.दीपक पाटील यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
भुसावळ (19 डिसेंबर 2024) : विचार हे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी महत्वाचे असतात. विचार आणि विकारांची कुस्ती सुरू असते. तुम्ही खुराक कुणाला देतात त्यावर यश अपयश अवलंबून असते. भरकटत जायचे नसल्यास चांगल्या विचारसोबत जाणे गरजेचे आहे. स्वतःला समजून घेतले पाहिजे. स्वतःसाठी दिवसातून दोन मिनिटे काढले पाहिजे, असा सल्ला व्याख्याते प्रा.दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला. अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गुरुवार, 19 रोजी के.नारखेडे विद्यालयात माजी खासदार तथा आमदार कृषिमित्र स्व.हरिभाऊ जावळे व स्व.पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित पुष्पांजली प्रबोधन मालेचे प्रथम पुष्प सावखेडा जळगाव येथील प्रा.दीपक पाटील यांनी गुंफले. ‘व्यक्तिमत्व घडवू या’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सचिव पी.व्ही.पाटील, मुख्याध्यापक युवराज झोपे, प्रकल्प प्रमुख डॉ.संजू भटकर, सहसमन्वयक प्रा.डॉ.शाम दुसाने, सहसमन्वयक हितेंद्र नेमाडे उपस्थित होते.
अंतर्नादचे कार्य ‘अनमोल’
प्रास्ताविकात प्रकल्प प्रमुख प्रा.डॉ.श्याम दुसाने यांनी अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येणार्या विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व पर्यावरण पूरक उपक्रमांची माहिती दिली. माजी खासदार तथा आमदार कृषी मित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व.पुष्पा वसंतराव पाटील यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून दरवर्षी पुष्पांजली प्रबोधन मालेचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.व्ही. ाटील यांनी अंतर्नाद प्रतिष्ठानचे कार्य समाजाला चांगली दिशा मिळवून देण्यासाठी अनमोल असल्याचे सांगितले.
आव्हानांना संधी मानून पुढे जा
विद्यार्थी मी करू शकतो हा दृष्टिकोन स्वीकारतो, तेव्हा तो अडचणींवर मात करण्यास समर्थ होतो. शिक्षणादरम्यान आलेल्या आव्हानांना संधी मानून पुढे जाणे आवश्यक आहे. ठाम ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केले, तर यश नक्कीच मिळते. मनापासून ठरवलेल्या गोष्टी कधी ना कधी पूर्ण होतातच, असा सल्लाही प्रा.दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला. संस्कार लहानपणीच दिले जातात, कारण फांदी ओलसर असते तेव्हाच मोळी बांधता येते. कडक झाल्यावर ते कठीण होते. आयुष्यात आई-वडील आणि शाळेचे संस्कार खूप महत्त्वाचे असतात. स्वतःचा अंतर्नाद जागृत झाला नाही तर समाजात आपले स्थान निर्माण करणे कठीण जाते. जीवनाला खरा अर्थ स्वतःच्या विचारांमुळेच प्राप्त होतो, असेही प्रा.दीपक पाटील यांनी सांगितले.
यांनी घेतले परिश्रम
प्रबोधनमालेसाठी रावेर विधानसभेचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, जळगावचे उद्योजक अजय बढे आणि दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सूत्रसंचालन शैलेंद्र महाजन तर आभार डॉ.संजू भटकर यांनी मानले. यावेळी अंतर्नाद प्रतिष्ठानचे सदस्य योगेश इंगळे, ज्ञानेश्वर घुले, कुंदन वायकोळे, विक्रांत चौधरी, अमित चौधरी, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील इत्यादी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी नियोजन समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.