आमदार चंद्रकांत पाटील यांचा पाठपुरावा : बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी 200 कोटींची तरतूद
Provision of Rs 200 crore for Bodwad Upsa Irrigation Scheme भुसावळ (19 डिसेंबर 2024) : जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यातील 53 हजार 449 हेक्टर क्षेत्रासाठी वरदान ठरणार्या बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेसाठी हिवाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात 200 कोटी रुपयांची तरतूद मंजूर झाल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली. यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वेग मिळणार असून बोदवड तालुक्यातील 11 हजार 500 हेक्टर जमिनीच्या सिंचनाचा लाभ होईल. या प्रकल्पाला उभारी देणारे आमदार चंद्रकांत पाटील हे जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागाचे नवं हरित क्रांतीचे खरे प्रणेते ठरणार असल्याने शेतकर्यात चर्चा आहे.
अनेक वर्षांपासून प्रकल्प रखडला
बोदवड परिसर उपसा सिंचन योजना हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केला होता. तर सरकार स्थापनेनंतर पहिल्याच हिवाळी अधिवेशनात 200 कोटी रुपयांची या प्रकल्पासाठी तरतूद झाल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. हा निधी मंजूर होण्यामुळे प्रकल्पाच्या कामाला नवीन ऊर्जा मिळाली आहे. बोदवड तालुक्याचा अवर्षणग्रस्त पट्टा या योजनेमुळे हिरवागार होणार आहे.
एक हजार 225 कोटींची कामे
2011 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाल. मात्र निधीअभावी हा प्रकल्प रखडला. गत काही वर्षांपासून आमदार चंद्रकांत पाटील यांनी या प्रकल्पासाठी सतत पाठपुरावा केला. त्यामुळेच या प्रकल्पासाठी 600 कोटी व 625 कोटी अशा एकूण एक हजार 225 कोटींच्या निविदा प्रक्रियेद्वारे कामे सुरू झाली. या योजनेचे काम दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्यात पंपगृह अ, पंपगृह ब, जुनोने साठवण तलाव आणि उद्धरण नलिका यांचा समावेश आहे. या टप्प्यात 14 हजार 994 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. दुसर्या टप्प्यात 38 हजार 455 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले जाईल. दरम्यान, तापी नदीच्या बॅकवॉटरपासून पाणी उपसा करून पूर्णा नदीकाठी खामखेडा येथे जॅकवेल बांधले जाईल. पहिल्या टप्प्यात 2500 मिमी व्यासाच्या पाईपद्वारे जुनोने तलावात हे पाणी सोडले जाईल. दुसर्या टप्प्यात 1850 मिमी पाईपद्वारे जामठी साठवण बंधार्यात पाणी पोहोचवले जाईल.
आमदार चंद्रकांत पाटील नवं हरितक्रांतीचे प्रणेते
बोदवड, जामनेर आणि मुक्ताईनगर तालुक्याला या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील 33 हजार 668 हेक्टर तर बुलडाणा जिल्ह्यातील 19 हजार 781 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.
अवर्षणामुळे त्रस्त असलेल्या या भागातील शेतकर्यांसाठी हा प्रकल्प वरदान ठरेल. बंद पाईपद्वारे शेतांपर्यंत पाणी पोहोचवल्यामुळे शेतकर्यांच्या उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ होईल. बंद पाईपद्वारे पाणीपुरवठ्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला जाईल. साठवण तलाव व बंधारे बांधण्याच्या योजनांमुळे पाणीपुरवठा अधिक सुकर होईल. यामुळे जलसंधारण व सिंचन व्यवस्थापन सुधारेल. बोदवड उपसा सिंचन हा प्रकल्प जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यांतील शेती क्षेत्रासाठी नवा अध्याय असून या प्रकल्पाचे आमदार चंद्रकांत पाटील नवं हरितक्रांतीचे खरे प्रणेते ठरणार आहेत.