खंडणी प्रकरण : वाल्मीक कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी
बीड (1 जानेवारी 2025) ः: सरपंच हत्येमुळे चर्चेत आलेला बीडमधील वाल्मीक कराड अखेर पुण्यात सीआयडीला सोमवारी दुपारी 12 वाजता शरण आल्यानंतर त्यास केजला नेण्यात आले व न्यायालयात रात्री हजर केल्यानंतर त्यास 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली.
शरण येण्याची व्हिडिओद्वारे दिली होती माहिती
वाल्मीक कराड याने मंगळवारी सकाळी एका व्हिडिओद्वारे आपण पुण्यातील सीआयडी कार्यालयात सरेंडर करणार असल्याचे सांगितले होते. तो आपल्या व्हिडिओत म्हणाला, मी वाल्मीक कराड. माझ्याविरोधात बीडच्या केज पोलिसात खंडणीची खोटी फिर्याद दाखल केली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना मी पुणे सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे मारेकरी जे कुणी असतील त्यांना अटक करून फाशीची शिक्षा दिली जावी. राजकीय द्वेषापोटी माझे नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे. पोलिस तपासाच्या निष्कर्षात मी दोषी आढळलो तर मी न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे.

15 दिवसांची पोलीस कोठडी : पुढे काय ?
आरोपी वाल्मीक कराडला दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात आता सीआयडीकडून अटक झाली आहे मात्र खंडणीखोरांना रोखण्याच्या वादातून सरपंच देशमुख यांचा खून झाला आहे तर कराडच्या सांगण्यावरून हा खून झाल्याचा आरोप होत असल्याने याप्रकरणाची चौकशी होईल शिवाय या प्रकरणातील तिघा पसार आरोपींबाबत विचारणा होईल व यापूर्वीचे खंडणी, अपहरण,मारहाणीच्या 14 गुन्ह्यांबाबतही तपास करण्यात येईल.









