जळगावचे आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश : जळगाव शहरातील प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी निधीस मंजुरी


जळगाव (गुरुवार, 16 जुलै 2026) : जळगाव शहरातील रस्ते सुरक्षित, सुशोभित व आधुनिक करण्याच्या उद्देशाने आमदार मा. श्री. सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांनी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून अपारंपारिक ऊर्जा विकास लेखाशीर्ष अंतर्गत जिल्हा नियोजन समिती, जळगावच्या सन 2026-27 या आर्थिक वर्षामधून जळगाव शहरातील अजिंठा चौफुली ते विमानतळाकडे जाणार्‍या प्रमुख मार्गावर आधुनिक एलईडी पथदिवे उभारण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे.

प्रकाश व्यवस्था होणार सक्षम
निधी मंजुरीमुळे अजिंठा चौफुली ते विमानतळाकडे जाणार्‍या प्रमुख मार्गावर आधुनिक एलईडी पथदिव्यांची उभारणी करण्यात येणार असून, या मार्गावरील प्रकाश व्यवस्था अधिक सक्षम होईल. त्यामुळे वाहनचालक, पादचारी, नागरिक तसेच विमानतळाकडे जाणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षिततेत मोठी भर पडणार आहे. याशिवाय शहराच्या सौंदर्यातही लक्षणीय वाढ होणार आहे.

दोन वर्षांपासून पाठपुरावा
या कामासाठी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांनी मागील दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. या प्रस्तावास जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजुरीची प्रक्रिया गतीने पूर्ण झाली.

यावेळी आमदार राजूमामा यांनी या विकासकामासाठी सहकार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हेच उद्दिष्ट
आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांनी सांगितले की, जळगाव शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या कामांसाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू असून, आगामी काळातही शहरासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून आणण्याचा प्रयत्न सुरू राहील. नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !