आगीच्या अफवेने रेल्वे रूळावर उड्या टाकणार्‍या 12 प्रवाशांना परधाडेनजीक बंगळूरू एक्स्प्रेनने चिरडले

15 हून अधिक रेल्वे प्रवासी गंभीर जखमी : जिल्हा प्रशासनाची घटनास्थळी धाव


Terrible train accident near Pardhade पाचोरा (22 जानेवारी 2025) : मुंबईकडे निघालेल्या अप लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसच्या पँट्रीकारला आग लागल्याच्या अफवेने जनरल कोचमधील काही प्रवाशांनी रेल्वे रूळावर उड्या टाकल्या मात्र त्याचवेळी डाऊन रेल्वे लाईनवरून येणार्‍या 12627 डाऊन कर्नाटक बंगळूरू-नवी दिल्ली एक्प्रेसखाली आल्याने 12 प्रवाशांचा चिरडून मृत्यू झाला तर 15 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले. काळीज पिळवटून टाकणारी ही धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवार, 22 रोजी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास घडली.

आगीच्या अफवेने प्रवाशांनी गमावला जीव
समजलेल्या माहितीनुसार, अप पुष्पक एक्सप्रेस परधाडे स्थानकाजवळून जात असताना रेल्वे रूळांच्या चाकांमधून ठिणग्या उडाल्याची तसेच पँट्री कारमधून धूर येत असल्याची अफवा गाडीच्या एका जनरल कोचमधील प्रवाशांपर्यंत पोहोचताच त्यांनी चैन पुलिंग करून गाडी परधाडे स्थानकाजवळ थांबवली. अचानक प्रवाशांनी आग, आग म्हणून गोंधळ घालण्यास सुरूवात करताच काही प्रवाशांनी कोचच्या दोन्ही बाजूला उड्या टाकल्या व त्याचवेळी डाऊन ट्रॅकवरून 12627 डाऊन कर्नाटक बंगळूरू-नवी दिल्ली एक्स्प्रेस आल्याने त्या खाली चिरडून 12 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 24 हून अधिक प्रवासी जखमी झाले.

जिल्हा प्रशासनाकडून अपघाताची दखल : उपचाराची व्यवस्था
जिल्हा प्रशासनाकडून जखमी व इतर प्रवाशांसाठी नजीकच्या स्थानकांवर तात्पुरती निवासी व्यवस्था करण्यात आली तसेच घटनास्थळावर आठ रुग्णवाहिका, पाण्याचा टँकर तसेच अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या तसेच पाचोरा उपविभागीय अधिकार्‍यांना सर्वोतोपरी जखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी निर्देश देण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय कंट्रोल रूम म्हणून जाहीर
जिल्हा प्रशासनाने चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व जिल्हाधिकारी कार्यालय कंट्रोल रूम म्हणून जाहीर केले आहे. रेल्वे खाली येऊन ठार झालेल्या प्रवाशांची ओळख परेडसाठी फॉरेन्सिक टीम पाठवण्यात आली आहे.

भुसावळ डीआरएमसह ताफा घटनास्थळी
भुसावळच्या डीआरएम ईती पाण्डेय यांच्यासह एडीआरएम तसेच रेल्वेच्या विविध वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मनमाडसह भुसावळ येथून अ‍ॅक्सीडेंट रिलीफ ट्रेन घटनास्थळी रवाा करण्यात आली तसेच रेल्वेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी कटर व इतर साहित्य घेऊन दाखल झाला.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल
अपघाताचे वृत्त कळताच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दाखल होत माहिती जाणून घेतली. अपघाताची पूर्ण माहिती घेऊन जखमींना उपचारार्थ हलवण्याच्या सूचना केल्या.

गंभीर जखमींवर पाचोर्‍यात उपचार : पालकमंत्री गुलाबराव पाटील
अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे व रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी सध्या घटनास्थळी उपस्थित असून मदतकार्य सुरू आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले तर गंभीर जखमींवर पाचोरा ग्रामीण रुग्णालय तसेच पाचोरा येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. ते म्हणाले, मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून असून प्रशासनाला सर्वोतोपरी मदत पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत. घटनास्थळी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मृत व जखमी प्रवाशांची माहिती मिळवण्यासाठी हा कक्ष कार्यरत आहे. मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याबाबत योग्य ती चर्चा देखील सुरू असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

या प्रवाशांचा ओढवला मृत्यू
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये एकूण 12 मृतदेह दाखल झाले आहेत. या 12 मृतदेहांपैकी सात मृतदेहांची ओळख पटली आहे. यात 9 पुरुष आणि 3 महिला मयत आहेत. हिंदू नंदराम विश्वकर्मा (11, रा.नेपाळ), लच्छी राम पासी (23, रा.नेपाळ), कमला नवीन भंडारी (43, रा.नेपाळ), जवकला बुट्टे जयगडी (50), नसीरुद्दीन बद्रुद्दीन सिद्दिकी (20 रा.कोंडा), इम्ताज अली (35, रा.गुलऱीहा उत्तर प्रदेश), बाबू खान (30) असे ओळख पटलेल्या मृतांची नावे आहेत तर पाच मृतांची अद्यापही ओळख पटलेली नाही. गोदावरी रुग्णालयात पाच तर विघ्नहर्ता हॉस्पिटल , पाचोरा येथे पाच जखमींवर उपचार सुरू असून अपघातात एकूण 24 प्रवासी जखमी झाले आहेत.


कॉपी करू नका.