मुंबईतील डीआरआयची मोठी कारवाई : युगांडातील प्रवाशांकडील 22 कोटींचे कोकेन जप्त
मुंबई (30 जानेवारी 2025) : विमानाने आलेल्या युगांडातील तिघांकडील 21.97 कोटींचे 2.2 किलो कोकेन जप्त करण्यात मुंबईतील डीआरआयला यश आले आहे. आरोपी प्रवाशांनी पोटात कोकेन असलेल्या तब्बल 170 कॅप्सूल घातल्या होत्या. शरीरात लपवून कोकेनची तस्करी करत असताना त्यांना पकडण्यात आल्यानंतर तस्कर हादरले आहेत.
संशय येताच कारवाई
युगांडामधील एंटेब्बे इथून आलेल्या विमानाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन नागरिक उतरले. महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) मुंबई विभागाच्या अधिकार्यांना संशय आल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशी केल्यानंतर तिघांनीही तस्करीच्या उद्देशाने ड्रग्ज असलेले कॅप्सूल घेतल्याचे कबूल केले.


या तिघाही संशयितांना दंडाधिकार्यांसमोर हजर करण्यात आले आणि न्यायालयाच्या आदेशानुसार, वैद्यकीय निरीक्षणासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी त्यांनी एकूण 170 कॅप्सूल पोटात घेतल्याचे आढळून आले. यामध्ये एकूण 2197 ग्रॅम कोकेन होते.
या कोकेनचे मूल्य अंदाजे 21.97 कोटी रुपये आहे. या प्रवाशांकडून अंमली पदार्थ नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार कोकेन जप्त करण्यात आले. एनडीपीएस कायद्याच्या तरतुदींनुसार त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.





