लॉजमधील ग्राहकाचे एटीएम लांबवत एक लाख सात हजार रुपये काढले
जळगाव (1 फेब्रुवारी 2025) : लॉजमध्ये थांबलेल्या ग्राहकाचे एटीएम चोरून भामट्याने बँकेतून एक लाख सात हजार 200 रुपये काढून रकमेवर डल्ला मारला. ग्राहकाचा 15 हजार रुपये किंमतीचा मोबाइलही चोरट्याने चोरून नेला. हा प्रकार शहरातील स्टेशन परिसरात हॉटेल अमरदीप येथील रूममध्ये गुरुवार, 30 रोजी उघडकीस आला.
काय घडले ग्राहकासोबत
अतुल यशवंत महाजन (38, रा.विनायक रेसिडेन्सी, पंचवटी नाशिक) हे जळगाव येथे हॉटेलच्या रूममध्ये थांबले होते. के. राघवेन्द्रा या अनोळखी इसमाने पहाटे 4.50 वाजेच्या सुमारास त्यांच्या रूममध्ये एण्ट्री केली. त्याने अतुल महाजन यांचे पैशांचे पाकीट, एटीएम कार्ड आणि त्यांचा मोबाइल चोरून नेला.


संशयिताने सकाळी सात वाजेपावेतो जळगावातून 99 हजार तसेच भुसावळ येथील एटीएममधून 15 हजार 500 रुपये काढले. ग्राहकाचा सुमारे 15 हजार रुपये किंमतीचा मोबाइल आणि पाकिटातील 2700, असा एकूण 1,32,200 रुपयांचा मुद्देमाल संशयिताने लंपास केला. या प्रकरणी तक्रारीनुसार गुरुवार, 30 रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार किशोर निकुंभ हे करीत आहेत.
एटीएममधून असे काढले पैसे
जळगावात 20 हजार प्रमाणे चार वेळा एचडीएफसी बँक, डीवायएसपी चौकातून संशयिताने काढले तर याच शाखेतून पुन्हा 19 हजार रुपये त्याने काढले. 15,500 रुपये एचडीएफसी बँक भुसावळ, 2700 रुपये पाकिटातील रोकड, 15 हजार रुपये किमतीचा मोबाइल असा 1,32,200 रुपयांचा मुद्देमाल संशयिताने चोरून नेला.
घटना कळल्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेला प्रकार तसेच सीसीटीव्ही संदर्भात माहिती घेतली. प्राप्त माहितीनुसार संशयित हा येथे गेस्ट म्हणून थांबला होता. संधी मिळताच त्याने महाजन यांच्याकडील मनीपाकिटसह एटीएम घेत पोबारा केला. के राघवेंद्रा (रा. 12, द्राक्षेमळा, रमाईश लेआऊट खेरेखोडी बसस्टॉप, होसाखेरहाली बेंगलोर, कर्नाटक) येथील त्याचा पत्ता नमूद आहे. त्या अनुषंगाने त्याचा शोध घेतला जात आहे.






