भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे मार्ग : यावलला श्रीकांत महाराज सराफ
यावलला श्री लक्ष्मीनारायण मंदिरासह चार मंदिरांमध्ये श्रीमद् भागवत कथा सप्ताहास प्रारंभ
यावल (शनिवार, 19 सप्टेंबर 2026) : भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे मार्ग आहेत. भगवंताचे नामस्मरण, सत्संग आणि श्रद्धेने केलेली भक्ती यामुळे जीवनातील अडचणींवर मात करण्याची प्रेरणा मिळते, असे विचार भागवतकार श्रीकांत महाराज सराफ यांनी येथे व्यक्त केले. शहरातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात शनिवारी दुपारी तीन वाजता श्रीमद भागवत कथा सप्ताहास भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. कथा सप्ताहाच्या पहिल्या दिवशी गोकर्ण महात्म्य या कथेचे निरूपण यावेळी श्रीकांत महाराजांनी केले.
श्रीमद भागवत अध्यात्मिक मार्गदर्शक
यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांना श्रीमद्भागवत ग्रंथाचे महत्त्व विशद करून भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा संदेश दिला. शहरातील विविध मंदिरांमध्ये सुद्धा श्रीमद् भागवत कथा सप्ताह सुरू झाला आहे.

गोकर्ण महात्म्य कथेचे निरूपण करताना श्रीकांत महाराज सराफ म्हणाले की, श्रीमद भागवत हा केवळ कथा सांगणारा ग्रंथ नसून मानवी जीवन जगण्याची दिशा देणारा आध्यात्मिक मार्गदर्शक आहे. गोकर्ण महात्म्याच्या माध्यमातून कर्माचे महत्त्व, नामस्मरणाची शक्ती आणि भगवंतावरील श्रद्धेचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचविण्यात आला. कथा ऐकण्यासाठी मंदिरात भाविकांची उपस्थिती होती. रविवारपासून कथा दररोज दुपारी 2.30 वाजता सुरू होणार असून, कथा सप्ताहात श्रीमद्भागवताच्या विविध प्रसंगांचे निरूपण करण्यात येणार आहे.



