सुसाट रिक्षा दुचाकीवर धडकली : कुसूंबा शिवारात पिता-पुत्र गंभीर जखमी
जळगाव (2 फेब्रुवारी 2025) : धार्मिक कार्यक्रमाला जात असताना समोरुन वेगातील प्रवासी वाहतूक रिक्षाने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार पिता-पुत्र जखमी झाले. गुरुवार, 31 रोजीत ही घटना सकाळी आठ वाजेच्या सुमारास कुसुंबा शिवारात विमानतळाच्या इन गेटसमोर संभाजीनगर मार्गावर घडली. मगन ढगे तसेच दिनेश ढगे असे जखमींची नावे आहेत.
मगन छगन ढगे ( 83) तसेच त्यांचा मुलगा दिनेश ढगे (रा.रेलगाव, ता. सिल्लोड, जि.संभाजीनगर) हे दोघे जण दुचाकी (एम.एच.20 डी.एम.7874) ने रायपूर (ता.जळगाव) येथे धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जात होते. जळगाव विमानतळ इन गेटजवळ समोरुन भरधाव प्रवासी रिक्षा (एम.एच.19 जे 8591) ने दुचाकीला धडक दिली. ढगे पिता-पुत्र दुचाकीवरुन रस्त्यावर फेकले जावून गंभीररित्या जखमी झाले. दुचाकीचेही नुकसान झाले. दुर्घटनेनंतर न थांबता अपघाताला कारणीभूत चालक रिक्षा घेऊन पसार झाला.प्रत्यक्षदर्शीनी जखमी पितापुत्राला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले.


प्रकरणी मगन ढगे यांच्या तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले यांनी धाव घेत घटनेची माहिती घेतली. हवालदार मुकुंद पाटील हे गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.






