साक्री तालुक्यात हाणामारीनंतर मृत्यू : सहा आरोपींना जन्मठेप
देशशिरवाडे येथील घटना : धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
धुळे (6 फेब्रुवारी 2025) : देशशिरवाडे (ता. साक्री) येथे हाणामारीनंतर एकाचा मृत्यू ओढवला होता. या प्रकरणी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली.
असे आहे प्रकरण
देशशिरवाडे (ता. साक्री) येथे काकाजी बाबूलाल माळी यांच्या घरासमोर सहा जणांनी येऊन त्यांच्यासह इतरांना मारहाण केली होती. यात हिरामण भावसिंग देसले याचा औषधोपचारादरम्यान मृत्यू झाला होता तर तीन जण जखमी झाले होते. 2 एप्रिल 2017 रोजी रात्री ही घटना घडली होती. यावरून सहा जणांविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला होता. यात अभिमन हिरामण सोनवणे, कन्हैया अशोक पवार, युवराज रमेश सोनवणे, बापू रमेश सोनवणे, लक्ष्मण उर्फ लखा हिरामण सोनवणे व राज लक्ष्मण सोनवणे या सहा जणांविरुद्ध तपासी अंमलदार- सहायक पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी धुळे जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.


जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांनी फिर्यादी व साक्षीदार मिळून नऊ जणांच्या साक्षी न्यायालयात नोंदविल्या. सरकार पक्षातर्फे नमूद साक्षीदारांच्या आलेल्या पुराव्यांच्या आधारे तवर यांनी युक्तीवाद केला.
सर्वोच्च न्यायालय व विविध उच्च न्यायालयांचे दाखले न्यायालयात युक्तीवादादरम्यान दाखल केले. उभयतांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपींचा गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश-4 जयश्री पुलाटे यांनी सहा आरोपींना शिक्षा सुनावली. भादंवि 302 अन्वये जन्मठेप तसेच प्रत्येकी 10 हजार रुपये दंड, भादंवि 324 अन्वये दोन वर्षे शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची रक्कम भरण्याचा आदेश न्यायालयाने दिला. कलम 147 अन्वये सहा महिने, कलम 148 अन्वये एक महिना शिक्षा ठोठावली. तसेच या घटनेतील दुखापती बापू हिरामण देसले, हिंमत हिरामण देसले यांना योग्य तो मोबदला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे यांना देण्याचा आदेश केला.
या खटल्यात जिल्हा सरकारी वकील डी.आर.तवर यांना अॅड.सिसोदिया व अॅड.मयूर बैसाणे यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकारी सहायक फौजदार आर. डी. साळुंखे यांनी काम पाहिले.
या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी तपास केला होता. यापूर्वी राईनपाडा प्रकरणी सुरुवातीचा तपास भाबड यांनीच केला होता. या खटल्यातसुद्धा आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.






