अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर जप्त
जळगाव (10 फेब्रुवारी 2025) : गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या उत्खनन करून वाळूची चोरटी वाहतूक करणार्या डंपरला एलसीबीच्या टिमने आकाशवाणी चौकात रविवार, 9 रोजी रात्री पकडले. डंपरसह सुमारे 4 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला.
अवैध वाळू पुन्हा ऐरणीवर
डंपर (क्र. एमएच 19 झेड 7774) मधून वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने महामार्गावरील आकाशवाणी चौकात वेलनेस मेडीकलसमोर सापळा लावला होता. डंपर येताच पथकाने थांबवून चौकशी केली. डंपरवरील चालक रवींद्र राजू सोनवणे (26), योगेश किरण रंधे (19, दोन्ही रा.सावखेडा) हे दोघे विनापास परवाना वाळूची चोरटी वाहतूक करीत होते. हे डंपर रमेश पानपाटील यांच्या मालकीचे आहे. मुद्देमालासह दोघांना पथकाने जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.








