वरखेडे धरणाचे पाणी शेवटच्या शेतकर्‍याच्या बांधापर्यंत नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध : शेतकरी मेळाव्यात आमदार मंगेश चव्हाण यांची माहिती

वरखेडे धरण लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांचा तांदूळवाडी ता.भडगाव येथे शेतकरी मेळावा व पाणीवापर संस्था प्रशिक्षण


तांदूळवाडी, ता.भडगाव (16 फेब्रुवारी 2025) : वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्पास मुळ प्रशासकीय मान्यता दि.01 मार्च 1999 रोजी मिळाली मात्र सन 2014 पर्यंत प्रकल्पाचे काम संथगतीने सुरु होते. सन 2014-15 मध्ये प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री मा.गिरीश भाऊ महाजन यांनी सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना केल्या व प्रकल्पास 09 मार्च 2018 रोजी द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. तद्नंतर प्रकल्पाचा समावेश केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्तपणे अर्थसहाय्यक बळीराजा जलसंजीवनी योजनेमध्ये 01 जानेवारी 2019 रोजी समावेश करण्यात आला. यानंतर खर्‍या अर्थाने धरणाच्या बांधकामाला गती आली. अखेर प्रकल्पांतर्गत असलेल्या मुख्य धरणाचे (बॅरेजचे) काम मार्च 2021 रोजी पूर्ण झाले. नियोजित क्षेत्र 8290 हे. यामध्ये चाळीसगांव तालुक्याचे 20 गावे 5687 हेक्टर आणि भडगांव तालुक्याचे 11 गावे 2603 हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी प्रस्तावित आहेत.वरखेडे-लोंढे बॅरेज मध्यम प्रकल्पासाठी पारंपारिक स्वरूपाचा खुला कालवा प्रस्तावित होता. मात्र यात पाणी गळतीचे प्रमाण लक्षणीय आहे. महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बंदिस्त पाटचारीचा प्रस्ताव नाकारला व हा प्रकल्प व्यवहार्य नाही असे लेखी पत्र दिले. मात्र 2022 मध्ये भाजपा सेना महायुती सरकार येताच या प्रकल्पाला तत्काळ मंजुरी मिळाली. आमच्या मागणीनुसार व शासनाच्या नविन धोरणानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले पाईपलाइन प्रणालीद्वारे सिंचन (झऊछ) या पर्यायाचा अवलंब करण्यात येत असून येत्या 2 वर्षात केवळ चाळीसगावच नव्हे तर भडगाव तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकर्‍याच्या बांधावर पाणी पोहोचविण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. ते तांदूळवाडी ता.भडगाव येथे वरखेडे धरण लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांचा मेळावा व पाणीवापर संस्था प्रशिक्षण प्रसंगी बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी खासदार स्मिताताई वाघ, आमदार किशोर आप्पा पाटील, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अधिक्षक अभियंता संतोष भोसले, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ यशवंत भदाणे, जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्र.2 चे कार्यकारी अभियंता कामेश पाटील, वरखेडे लोंढे उपविभाग शाखा अभियंता किरण तायडे, यांच्यासह बाजार समिती सभापती मच्छिंद्र राठोड, पोपट तात्या भोळे, रावसाहेब पाटील, संतोष भोसले, धर्मा आबा वाघ, संजय तात्या पाटील, डॉ. विशाल पाटील, विकास तात्या पाटील, शेषराव बापू पाटील, सुनील जमादार, मंगेश (मुन्नाबापू) पाटील, सुभाष पाटील, सुनील निकम, नितीन पाटील, बापूसाहेब निकम, नवल पवार, कपिल पाटील, रवींद्र पाटील, साहेबराव राठोड, विजय दिनकर पाटील, सरपंच दीपक चव्हाण, सीमचे उपसरपंच ज्ञानेश्वर महाजन, तुषार चव्हाण, दादाभाऊ पाटील, दिलीप काका चव्हाण, वाल्मीक बोरसे, अनिल पाटील, राहुल पाटील, अनिल महाजन, गिरीश बराटे, काशिनाथ शिरसाठ, सचिन चव्हाण, सोनू भाऊ धनगर, ज्ञानेश्वर चव्हाण, सुरेश महाराज, शिवदास महाजन यांसह वरखेडे धरण लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


विविध शंकांचे निरसन
मेळावा प्रसंगी चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील वरखेडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण व किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकर्‍यांच्या विविध शंकांचे निरसन व नवीन मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.

तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता येत्या दोन आठवड्यात
आमदार चव्हाण यांनी मनोगतात पुढे सांगितले की, जुन्या पारंपारिक पद्धतीने पाटचारी झाली असती तर किमान 6 वर्ष फक्त भूसंपादन, पुढील 4 वर्ष बांधकाम असे किमान 10 वर्ष पाणी बांधापर्यंत येण्यासाठी लागले असते. याकाळात पारंपारिक कालव्याची 700 कोटी किंमत दुप्पटीने म्हणजे 1400 कोटी इतकी वाढली असती. यासोबतच धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणार्‍या तामसवाडी गावाचे जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत धरणाचे काम होऊ देणार नाही अशी ग्रामस्थांची भूमिका होती, यातून मार्ग काढत त्यांच्या मागणीनुसार मालेगाव रोड येथे तामसवाडी गावाच्या पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. या बुडीत क्षेत्राचे भूसंपादन, तामसवाडी पुनर्वसन, गिरणा नदीवर मोठे व छोटे वरखेडे गावाला जोडणारा पूल यासह संपूर्ण प्रकल्प 100 टक्के कार्यान्वित होण्यासाठी 1275 कोटींची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता येत्या 2 आठवड्यात देण्याचा शब्द जलसंपदामंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांनी आपल्याला दिला असल्याची माहिती आमदार चव्हाण यांनी दिली.

नार – पार नदीजोड प्रकल्पाच्या पुर्ततेसह आता गिरणेवर खर्चिक बलून एवजी पारंपारिक पद्धतीचे बंधारे – आमदार किशोर आप्पा पाटील
शेतकरी मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. सदर बंदिस्त पाटचारी कामात माझा जरी खारीचा वाटा असला तरी यामध्ये सिंहाचा वाटा आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा आहे. येत्या 2 वर्षात प्रत्यक्षात हे पाणी शेत शिवारात खेळेल मात्र महायुती सरकारच्या माध्यमातून केवळ हाच प्रकल्प नव्हे तर गिरणा खोर्‍याला संजीवनी ठरणारा नार – पार नदीजोड प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरु राहणार आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या वेळी गिरणा नदीवर बलून बंधारे बांधण्यासाठी हेलिकॉप्टरने हवाई पाहणी व गिरणा परिक्रमा करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले गेले मात्र बलून बंधारे हवेतच राहिले. जे व्यवहार्य आहे आणि करता येणे शक्य आहे तेच आश्वासन लोकांना द्यावे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे, 250 कोटींच्या बलून बंधार्‍यांची किंमत आता 1200 कोटीपर्यंत गेली याच्या 25 टक्के खर्चात व कमी वेळेत गिरणा नदीवर पारंपारिक पद्धतीचे 10 बंधारे बांधता येतील. त्यामुळे यापुढे बलून बंधारे नावावर राजकारण न होऊ देता कमी खर्चात व कमी वेळेत होणारे पारंपारिक बंधारे होण्यासाठी आमचा पाठपुरावा राहणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !