मैत्रिणींनो, कोणता दिवस शेवटचा असेल सांगता येत नाही !

मृत्यूपुर्वी ‘तिने’ लिहिलेल्या भावनिक पोस्टने अनेकांना अश्रु अनावर ; वयाच्या 28 व्यावर्षीचं गाठले कर्करोगाने


जिजाबराव वाघ

चाळीसगाव (2 मार्च 2025) : आज माझ्याकडे काय नाहीए…गाडी आहे. बंगला सोनं..पती क्लासवन अधिकारी…मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही…त्यामुळे मैत्रिणींनो आनंदी रहा…छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी रहा…तुलना करु नका…’ मृत्यूपूर्वी काही तास अगोदर समाजमाध्यमावर लिहिलेली ही भावनिक पोस्ट आहे…28 वर्षीय प्रतिक्षा समाधान पाटील यांची. 27 रोजी या विवाहितेचा कर्करोगाने दुर्देवी अंत झाला. गेल्या वर्षभरापासून त्यांचा कर्करोगाशी सामना सुरु होता. 28 रोजी चाळीसगाव तालुक्यातील पिराचे बोरखेडे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भादली, ता.जळगाव हे प्रतिक्षा यांचे माहेर. वडिल मनोज आत्माराम पाटील हे ग.स.पतसंस्थेचे माजी अध्यक्ष असून शैक्षणिक वर्तूळात कार्यरत आहे. प्रतिक्षा यांचे शिक्षण एमएडीएड होते. करंज ता. जळगाव येथील प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. अभ्यासू आणि प्रयोगशील मुख्याध्यापिका म्हणून त्यांना वेगळा ठसाही कोरला आहे. मृत्यूपूर्वी समस्त महिलांना उद्देशून लिहिलेली त्यांची ही भावनिक पोस्ट जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर विशेषतः महिलांनी आपल्या अश्रुंना वाट मोकळी करुन देत, काहींनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या.

20 दिवसांपूर्वी शस्रक्रिया…अन् सगळंच संपल
प्रतिक्षा समाधान पाटील यांचा विवाह वयाच्या 24 व्या वर्षी यावल वनविभागातील वनाधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला. हे दाम्पत्य जळगाव येथेचं वास्तव्यास होते. सुरुवातीला जीभेवर फोड आल्यानंतर प्रतिक्षा यांनी त्यावर उपचार केलेही. तीन महिने उपचार सुरुचं होते. मात्र यानंतर जीभेला गाठ झाली. तपासणी झाली. गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाले. अवघे कुटूंब सुन्न झाले.
1…कर्करोगावरील जीवघेण्या उपचारांची एक मालिकाचं सुरु झाली. त्यालाही प्रतिक्षा सामो-या गेल्या. 20 दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्रक्रिया झाली. यात त्यांची जीभ काढण्यात आली. त्यांचे वजन 10 किलोने कमी झाले. आपल्याला आता बोलता येणार नाही. याचे दुःखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले आहे. शस्रक्रियेनंतर अवघ्या 20 दिवसानंतर शेवटी मृत्यूने त्यांना गाठले. साजि-या – गोजि-या अशा याविवाहितेचा असा दूर्देवी अंत झाला. त्यांच्या मृत्यूने भादली आणि पिराचे बोरखेडे येथे शोककळा पसरली आहे.

मैत्रिणींनो तुलना करु नका..आहे तसे जगा
प्रतिक्षा यांच्या पोस्ट मध्ये त्यांची आयुष्याबद्दलची सकारात्मकता प्रत्येक शब्दात व्यक्त होते. ’शस्रक्रिया झाली तेव्हा मी खूप रडले…मला बोलता येणार नाही…यापेक्षा मी वाचले. याचा माझ्या कुटूंबाला अधिक आनंद होता…’ परंतू प्रतिक्षा यांचा आणि त्यांच्या कुटूंबियांचा हा आनंद काहीकाळचं टिकला. यानंतर त्यांच्या मृत्यूने सकारात्मतेची उजेडवातचं विझवून टाकली.
आपल्या पोस्ट मध्ये पुढे लिहितात…’मैत्रिणींनो, बायका – मुलींना तुलना करायची सवय असते. आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दूर्लक्ष करतो. आयुष्यात सगळ समोर असतांना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना…त्याला जीवनाची किंमत कळते. तेव्हा छोट्या – छोट्या गोष्टींमध्ये आनंदी रहा…जीवन जगा…’


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !