कुशल शासक अहिल्यादेवी होळकर यांचा ‘जीवनपट नाटीकेतून उलगडणार’ ! : रजनी सावकारे

भुसावळ शहरात 9 रोजी भव्य कार्यक्रम : कर्तबगार महिलांचाही होणार सन्मान


भुसावळ (5 मार्च 2025) : कुशल शासक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रतिष्ठा महिला महिला मंडळ यांच्या माध्यमातून रविवार, 9 रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारीत नाटीकेचे सादरीकरण होणार असल्याची माहिती प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्ष रजनी संजय सावकारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरातील सुरभी नगरातील मंत्री सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात बुधवार, 5 मार्च रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, अहिल्यादेवी या एक कुशल शासक होत्या. त्यांची निष्पक्षता आणि उत्कृष्ट प्रशासनाची उदाहरणे आजही मार्गदर्शक आहेत. इतिहासात त्यांच्या पराक्रमाचा अवीट ठसा उमटलेला असून भारतात हिंदू मंदिरांसह तीर्थस्थळांच्या जीर्णोद्धारासह अन्नछळ, घाट, धर्मशाळा, विहिरीत उभारण्यात मोलाचे योगदान असल्याने कार्य आजच्या पिढीसमोर येण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्री जन्मशताब्दी वर्ष
रजनी सावकारे म्हणाल्या की, अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाला येत्या 31 मे रोजी प्रारंभ होत आहे शिवाय 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन असून या दिनाचे औचित्य साधून थोर पुरूषांच्या कार्याचा इतिहास आजच्या पिढीला व महिला, पुरूषांना कळण्यासाठी प्रतिष्ठा मंडळातर्फे अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट नाटीकेतून उलगडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या नाटीकेत स्थानिक कलावंतांचा सहभाग आहे. यापूर्वी प्रतिष्ठा मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, राणी पद्मावती, झाशीची राणी, माँ जिजाऊ यांचा इतिहास कळण्यासाठी त्या संदर्भात कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.


अहिल्यादेवी महान शासक
रजनी सावकारे पुढे म्हणाल्या की, भारतातील महान शासकांपैकी अहिल्यादेवी होळकर यांचे नाव घेतले जाते. त्यांचा इतिहास आजच्या महिलांना व तरुण पिढीला कळण्यासाठी अहिल्यादेवी यांचा जन्म ते मृत्यूपयर्यंतचे महत्त्वाचे टप्पे नाटकाच्या माध्यमातून सादर करण्यात येतील. शहरातील वांजोळा रस्त्यावरील स्टॉर लॉनमध्ये रविवार, 9 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नाटीकेचे सादरीकरण स्थानिक कलावंतांच्या माध्यमातून होणार आहे. याच कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांचा सन्मानही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसादख पोलीस अधीक्षक डॅ.महेश्वर रेड्डी, डीआरएम ईती पाण्डेय, भुसावळ पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांचा गौरवशाली इतिहास जाणून घेण्यासाठी भुसावळ शहर व तालुक्यातील विद्यार्थी, तरुण, महिला, पुरूषांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे तसेच सर्व सदस्यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !