बीडमधील आकाच्या घरात छापेमारी : जप्त साहित्याची यादी पाहून बसेल धक्का
बीड (8 मार्च 2025) : बीड जिल्ह्यातील कुविख्यात गुन्हेगार सतीश भोसले उर्फ खोक्या याचे नवनवे प्रताप समोर आले आहेत. खोक्याकडून एका व्यक्तीला अर्धनग्न करून मारहाण केली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो वन्यप्राण्यांची शिकार करत असल्याचीही माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर वनविभागाने पोलिसांसह खोक्याच्या घरावर धाड टाकत शिकारीच्या साहित्यासह धारदार शस्त्रेही जप्त केल्याची माहिती आहे.
पोलिसांनी आज सतीश भोसले याच्या घरी टाकलेल्या धाडीत मोर आणि हरीण पकडण्यासाठी लागणारी जाळी, वाघोर, धारदार शस्त्र आणि वन्य प्राण्यांचे मांसही जप्त केल्याची माहिती आहे. सतीश भोसले याने यापूर्वी अनेकदा प्राण्यांची शिकार केल्याचं बोललं जात आहे. परंतु त्याचे आता विविध व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागालाही जाग आली असून त्याच्याभोवती कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात झाली आहे.

बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात दहशत निर्माण करणारा सतीश भोसले उर्फ खोक्या हा सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्याचं उघड झालं आहे. खोक्याचा एक-एक कारनामा समोर येऊ लागल्यानंतर सुरेश धस यांचीही राजकीय कोंडी झाल्याचं दिसत आहे.
सतीश भोसले हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात बीड व अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण 6 प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये विवाहितेचा छळ करणे, अपहरण करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे आदींचा समावेश आहे.
