भर चौकात अश्लील वर्तन : बड्या घरचा दिवट्या गौरव आहुजाला अखेर अटक
Gaurav Ahuja पुणे (9 मार्च 2025) : बडा घरचा दिवट्या असलेल्या तरुणाने भर चौकात दारूच्या नशेत लघू शंका करीत अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना विद्येच्या माहेरघरात घडली. याप्रकरणी टीकेची झोड उठल्यानंतर व संताप व्यक्त होवू लागताच संशयीत गौरव आहुजाने घडल्या प्रकाराची व्हीडिओ जारी करीत माफी मागत पोलिसांना सरेंडर होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर शनिवारी रात्री सातारा जिल्ह्यातील कराड पोलिसांनी ताब्यात घेत पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गौरव आहुजासह त्याचा मित्र भाग्येश ओसवाला यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. भाग्येश ओसवालचा मेडिकल रिपोर्ट पोलिसांच्या हाती लागला असून त्याच्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचे प्रमाण आढळले आहे तर गौरव आहुजाचा मेडिकल रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे.

पुणे नगर रोडवरती शास्त्रीनगर चौकात एक इचथ कार ( क्रमांक एमएच 12 आरएफ 8419) उभी करत गौरव अहुजाने मद्यधुंद अवस्थेत लघुशंका केली. यानंतर एका व्यक्तीने त्याला हटकले असता त्याच्यासमोर अश्लील कृत्य केले. त्याचबरोबर भरधाव वेगात गाडी चालवून तरुण मित्रासह फरार झाला. जागतिक महिला दिनाच्या दिवशीच श्रीमंत बापाच्या मुलाचे असे कृत्य समोर आल्याने पुण्यात संतापाची लाट उसळली होती. त्याच्या या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो पसार झाला होता. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
मी गौरव आहुजा, माझ्याकडून आज सकाळी पुण्याच्या रस्त्यावर कृत्य घडले. हे कृत्य खूप वाईट होते. मी मनापासून माफी मागतो. संपूर्ण जनता आणि शिंदे साहेब यांची मनापासून माफी मागतो. मी मनापासून माफी मागतो, मला माफ करा. मला एक चान्स द्या, सॉरी…’ असे तो आपल्या व्हिडिओमध्ये म्हणत आहे. तसेच , मी पोलिस स्टेशनमध्ये हजर होणार आहे. कृपया माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका, अशी विनंतीही गौरव अहुजाने केली.
