यावल तालुक्यात प्रेम विवाह केल्याच्या रागातून भाचीवर हल्ला : मामाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

Niece attacked in anger over love marriage in Yaval taluka: Case finally registered against uncle यावल (12 मार्च 2025) : यावल तालुक्यातील पिंप्री येथे प्रेमविवाह केल्याच्या रागातून 18 वर्षीय तरुणीवर तिच्या मामाने प्राणघातक हल्ला केला होता. ही घटना शनिवार, 8 मार्च रोजी सकाळी आठ वाजता घडली होती. याप्रकरणी चार दिवसानंतर अखेर यावल पोलीस ठाण्यात तरुणीच्या फिर्यादीवरून मामाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले नेमके ?
पिंप्री, ता.यावल या गावात स्वप्नील सपकाळे यांच्या राहत्या घरात वैष्णवी विनोद तायडे (18, रा.उल्हासनगर) हिने प्रेम विवाह केला या रागातून तिचे मामा उमाकांत चिंधू कोळी (पाडळसे, ता.यावल) यांनी शनिवार, 8 मार्च रोजी सकाळी आठ वाजता पिंप्री येथे जाऊन वैष्णवी तायडेवर केळी कापण्याच्या बक्खीने हल्ला चढवत तिला जबर दुखापत केली होती. या घटनेत वैष्णवीला वाचवण्याकरिता तिची नणद वैशाली स्वप्निल सपकाळे ही समोर आल्याने तीदेखील जखमी झाली. या प्रकरणी मंगळवारी वैष्णवी तायडे हिच्या फिर्यादीवरून तिचे मामा उमाकांत कोळी याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.


