धक्कादायक : मालेगावात स्मशानातून महिलेच्या अस्थी गायब
मालेगाव (18 मार्च 2025) : मालेगावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मृत झालेल्या महिलेच्या अस्थी गायब झाल्या असून महिलेच्या सरणातील राखेवर मात्र लिंबू, खिळे, कुंकू आदी साहित्य आढळल्याने हा प्रकार जादूटोण्याचा असल्याने छावणी पोलिसांकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण
संगमेश्वर भागात राहणार्या जमुनाबाई बापू पाटील (75) यांचा शनिवारी मृत्यू झाला. अंत्यसंस्कारानंतर सोमवारी सकाळी कुटुंबीय राखेच्या कार्यक्रमासाठी स्मशानभूमीत गेले होते. तेथील प्रकार बघून त्यांना धक्काच बसला. पाटील यांच्या सरणावरील राख बाजूला पडली होती तर अस्थी गायब होत्या. तसेच राखेवर जादूटोण्यासाठी वापरल्या जाणार्या संशयास्पद वस्तू आढळून आल्या.

कुटुंबीयांनी हा प्रकार छावणी पोलिसांना कळवला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परिसरात अस्थींचा शोध घेण्यात आला. मात्र, अस्थी कुठेही सापडल्या नाहीत. अस्थी कुणी नेल्या असतील, जादूटोणा करण्याचा हेतू काय असेल याचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केल्याचे सांगण्यात आले.




