बोदवड घनकचरा सफाई कर्मचार्यांचे काम बंद आंदोलन
बोदवड (19 मार्च 2025) : बोदवड नगरपंचायतीत ठेकेदारी पद्धतीने घनकचरा साफसफाई करणार्या कर्मचार्यांना किमान वेतन मिळत नसल्यामुळे त्यांच्यात नाराजीची भावना आहे. कंत्राट मिळाल्यापासून कर्मचार्यांना भविष्य निर्वाह निधी न देणे (पी.एफ), साप्ताहिक सुट्टी न देणे, कर्मचार्यांसाठी लागणारे साहित्य व सेफ्टी किट न देणे यांच्या निषेधार्थ बोदवड नगरपंचायती समोर नऊ दिवसांपासून काम बंद आंदोलन कर्मचार्यांनी पुकारले आहे. आंदोलनाकडे मुख्याधिकारी व नगरपंचायतीने दुर्लक्ष केल्यानंतर वाल्मिकी समाजाचे प्रदेशाध्यक्ष मिथुन बारसे यांनी भेट देत प्रशासनाच्या कार्य पद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली.
यांची होती उपस्थिती
यावेळी महासचिव गणेश बारसे, वाल्मिकी सेना अध्यक्ष राजू सारवाण, आकाश कवडे, प्रवीण झांझोटे, संतोष विधाने, संतोष झंझोटे, संतोष थांबेत, विशाल चावरे, अंकुश पाटील, डॉ.उध्दव पाटील, व्यापारी संघटना अध्यक्ष गोपाल अग्रवाल, स्वीकृत नगरसेवक दीपक झांबड, गजानन खोडके, अतिशय सारवाण, ललित सारवाण आदींनी भेट दिली.

कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला तसेच मान्यवरांनी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
