पाच लाखांची लाच घेताना बदली झालेल्या मुख्याधिकार्‍यासह चौकडी एसीबीच्या जाळ्यात


कर्‍हाड, जि.सातारा (26 मार्च 2025) : बांधकाम परवान्यासाठी दहा लाखांच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपये स्वीकारताना दोघांना सातार्‍याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री सापळा रचून ताब्यात घेतले. या प्रकरणात मुख्याधिकार्‍यासह चौघांवर कर्‍हाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. विशेष म्हणजे कर्‍हाड पालिकेतून बदली झालेले मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह चौकडीला एसीबीने आरोपी केले आहे.

मुख्याधिकारी शंकर खंदारे (रा. कर्‍हाड, मूळ रा. सातारा), सहायक नगररचनाकार स्वानंद दिलीप शिरगुप्पे (सध्या रा. संकल्प प्राइड, देसाईनगर, कर्‍हाड, मूळ रा. कोडोली, ता. पन्हाळा), बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक तौफिक कयूम शेख (रा. कार्वेनाका, सुमंगलनगर, कर्‍हाड) व अजिंक्य अनिल देव अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यापैकी स्वानंद शिरगुप्पे व तौफिक शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे.


मुख्याधिकारी शंकर खंदारे यांची नुकतीच बदली झाली आहे. 20 मार्च रोजी त्यांनी कर्‍हाड पालिकेचा पदभार सोडला आहे. मात्र, तरीही खासगी इसम अजिंक्य देव याच्यामार्फत त्यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या बांधकाम परवान्याबाबतच्या चलनांवर सह्या केल्याचे लाचलुचपतच्या अधिकार्‍यांना आढळून आले. त्यामुळे मुख्याधिकारी खंदारे याच्यासह इतर तिघांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !