महिला वाहतूक पोलिसाचा विनयभंग
Sexual harassment of female traffic police officer नागपूर (5 ऑगस्ट 2025) : राज्यात महिलांसह मुलींवर अत्याचार होत असताना नागपूरात मात्र महिला वाहतूक पोलिसाचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. व्हीआयपी ताफ्याजवळ जाण्यापासून रोखल्याच्या संतापातून एका व्यक्तीने भर रस्त्यावर महिला वाहतूक पोलिसाला मारहाण करत तिचा विनयभंग केला.
दहीबाजार पुलाजवळ सोमवारी सायंकाळी हा धक्कादायक प्रकार झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ‘कॉन्व्हॉय’ आझमशाह चौकाकडून शांतीनगरकडे जाणार असल्याची वाहतूक पोलिसांकडून माहिती मिळाली. मारवाडी चौक, दहीबाजार पुलाच्या मार्गाने ताफा जाणार असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.





सायंकाळी तेथे वाहतूकीची कोंडी होऊ नये यासाठी जागोजागी पोलीस तैनात होते. सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास गडकरी यांचा ताफा दहीबाजार पुलाजवळ पोहोचला. त्यावेळी तेथे दोन महिला कर्मचारी कर्तव्यावर होत्या.
वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यावेळी सैय्यद सज्जाद मुजफ्फर अली (कश्यप कॉलनी, शांतीनगर) हा माल धक्क्याकडून आला व रस्ता ओलांडू लागला. ते पाहून महिला पोलीस कर्मचार्याने त्याला व्हीआयपी ताफा जात असल्याने वाहतूक थांबविली आहे. तू कॉन्व्हॉयकडे जाऊ नको असे म्हणत त्याला थांबविले.
यावरून संतापलेल्या सैय्यदने महिला पोलीस कर्मचार्याला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने तिला धक्काबुक्की केली. व्हीआयपी ताफा तेथून गेल्यानंतर सैय्यदने महिला कर्मचार्याला मारहाण सुरू केली. त्यानंतर तिचा शर्ट पकडून विनयभंग केला.
हा प्रकार कानावर पडताच अनेक अधिकार्यांनी लकडगंज पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. काही अधिकारी घटनास्थळीदेखील पोहोचले. संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
