भारतीय स्वातंत्र्य लढ्यात यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांचे योगदान

प्रा.जतीन मेढे
यावल (9 ऑगस्ट 2025) : भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या पण 09 ऑगस्ट 1942 हा दिवस विशेष स्थान राखून आहे. याच दिवसाला महात्मा गांधींनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात ‘छोडो भारतची’ हाक दिली आणि संपूर्ण भारतात ब्रिटिश सत्तेविरोधात संतापाची भावना तयार होऊन असहकाराची लाट निर्माण झाली. या दिवसाला ‘ऑगस्ट क्रांतीदिन’ म्हणून भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.

सोबतच या दिवसाला ‘जागतिक आदिवासी दिन ’ म्हणूनही जगाने मान्यता दिलेली आहे.. आदी +वासी म्हणजे आदी पासून (पूर्वीपासून, मूळ निवासी) वास – निवास करणारे लोक म्हणजे आदिवासी होय.
आदिवासी बांधवांचे महत्वपूर्ण योगदान
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा विचार करतांना आदिवासी बांधवांचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान या लढ्यात राहिलेले आहे. जसे पूर्वीच्या बिहार आणि आताच्या छत्तीसगडमधील बिरसा मुंडा या थोरक्रांती नायकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे तसेच यावल तालुक्यातील तत्कालीन सातपुडा पर्वत रांगांमध्ये राहणार्या आदिवासी भिल्लांचेही योगदान विशेष महत्त्वपूर्ण राहिलेले आहे.
11 एप्रिल 1858 मध्ये यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतातील ‘अंबापाणी’ या ठिकाणी आदिवासी भिल्ल आणि ब्रिटिश सैनिकांमध्ये झालेली लढाई ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अविस्मरणीय घटना आहे.
यावल तालुक्यातील अंबापाणी या सातपुड्याच्या पर्वत रांगांमधील आदिवासी गावात त्यावेळेस थोर क्रांतिकारक खाज्या नाईक राहत होते. ब्रिटिश सत्तेला घाम फोडणारा हा जिगरबाज क्रांतिकारक याच परिसरात राहून आपल्या आदिवासी बांधवांच्या माध्यमातून स्वातंत्र्याची मशाल खर्या अर्थाने पेटवीत होता…..त्यांच्या या कार्यामुळे राना- वनातील आदिवासी बांधवांच्या मनात ब्रिटिश सत्तेविरोधात असंतोष निर्माण होऊन ब्रिटिश सत्तेला ते हादरे देत होते. त्यामुळे खाज्या नाईक यांना पकडून जेलमध्ये टाकण्याचे आदेश ब्रिटिश सैनिकांना देण्यात आले होते. परंतु थोर क्रांतिकारक ख्वाजा नाईक यांना पकडणे एवढे सोपे नव्हते. त्यामुळे हे सगळे लक्षात घेऊन ब्रिटिशांनी 2500 सैनिक अंबापाणी येथे ख्वाजा नाईक यांना पकडण्यासाठी पाठवले होते.
या ठिकाणी जंगलातील भिल्ल आणि इतर आदिवासी व ब्रिटिशांच्या सैनिकांमध्ये तुंबड लढाई झाली. आपल्या तीर कांबट, गोफण या तत्कालीन आदिवासी बांधव वापरत असलेल्या हत्यारांनी 2500 ब्रिटिश सैनिकांना मुठभर आदिवासी बांधवांनी सळो की पळो करून सोडले. या लढाईत 16 इंग्रज अधिकारी मारले गेल्याची नोंद आहे तर अनेक ब्रिटिश सैनिक गंभीर जखमी झाले.
ब्रिटिश सैनिकांच्या बंदुकांनी व तत्कालीन आधुनिक हत्यारांनी यावल तालुक्यातील 65 भिल्ल आदिवासी क्रांतिकारक या लढ्यात ठार झालेत….. 57 भिल्लांना पकडून ढोल ताशे लावून ब्रिटिशांनी त्यांना हाल हाल हाल करून मारले.
तर 21 आदिवासी भिल्लांना अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये पाठवण्यात आले आणि तिथेच त्यांना मारण्यात आले. आम्हाला अंदमान येथे कैदी केलेले स्वातंत्र्यवीर सावरकर इतिहासातून कळाले परंतु यावल तालुक्यातील 21 आदिवासी भिल्लांना अंदमान येथे हाल हाल करून ब्रिटिशांनी मारले हे मात्र दुर्लक्षित राहिले….. ?
अंदमान निकोबार येथील सेल्युलर जेलच्या बाहेर जो स्मृतीस्तंभ उभारला गेला आहे त्या स्मृतिस्तंभावर यावल तालुक्यातील शहीद झालेल्या या 21 आदिवासी क्रांतिकारकांची नावे कोरली आहेत……देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आमच्या आदिवासी क्रांतिकारकांचे हे एवढे मोठे योगदान दुर्लक्षित कसे करता येईल ?
आज 9 क्षज्ञीींह ऑगस्ट क्रांतीदिन आणि आदिवासी दिनाच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणार्या माझ्या यावल तालुक्यातील या तमाम आदिवासी क्रांतीनायकांना नमन….!
शासन आणि लोकप्रतिनिधींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण योगदान देणार्या आमच्या आदिवासी बांधवांचे आणि अंबापाणी येथील स्वातंत्र्य लढ्यातील या लढाईच्या स्मृती आम्हा सर्वांना प्रेरणादायी ठरण्यासाठी अंबापाणी येथे भव्य स्मृतिस्थळ उभारून हा क्रांतीचा इतिहास नव्याने जनतेपर्यंत नेऊन इतिहासाचे पुनर्लेखन करणे महत्त्वाचे आहे…..!
प्रा.डॉ.जतीन श्रीधर मेढे
(कला व विज्ञान महाविद्यालय भालोद. तालुका यावल, जिल्हा जळगाव मो.9545072600)
