मालेगावातील पवारवाडी पोलिसांची मोठी कारवाई : नाशिकसह जळगाव जिल्ह्यातून 30 दुचाकींसह ट्रॅक्टर चोरणार्यांना बेड्या
Major action by Pawarwadi police in Malegaon : 30 two-wheelers and tractor thieves arrested from Nashik and Jalgaon districts मालेगाव (13 ऑगस्ट 2025) : नाशिकसह जळगाव जिल्ह्यातून दुचाकी व ट्रॅक्टर चोरणार्यांच्या टोळीला मालेगावातील पवारवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पवारवाडी ठाण्याचे डॅशिंग पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
संवदगाव फाट्याजवळ पोलिसांनी सापळा रचल्यानंतर शहेजाद इकबाल (सलामताबाद, मालेगाव), शेख युसूफ (गुलशेरनगर, मालेगाव) या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता दुचाकी चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली. तसेच त्यांच्या अन्य तीन साथीदारांची नावे उघड केली. त्यानुसार पोलिसांनी शेख नजीम अब्दुल हमीद (रौनकाबाद), प्रल्हाद वाघ आणि देविदास वाघ (संवदगाव, मालेगाव) या तिघांना ताब्यात घेतले.





या भागातून केल्या चोर्या
चौकशीत या पाच जणांच्या टोळीने पवारवाडी, छावणी, किल्ला, मालेगाव कॅम्प, नांदगाव, निफाड, पिंपळगाव, कळवण, चांदवड, नाशिक शहर,पंचवटी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकींची चोरी केल्याचे उघड झाले. याशिवाय जळगाव जिल्ह्यातील धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ट्रॅक्टरची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आतापर्यंत केलेल्या तपासात विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या आणि या टोळीने केलेल्या एकूण 14 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले.
दोन आठवड्यांपूर्वी कॅम्प पोलिसांनी दोन चोरट्यांना शिताफीने अटक करून त्यांच्याकडून चोरी झालेल्या 23 दुचाकी जप्त केल्या होत्या. पाठोपाठ पवारवाडी पोलिसांनी चोरीस गेलेल्या 30 दुचाकी ताब्यात घेत आणखी एक मोठी कारवाई केली.
जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक तेगबिरसिंग संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल खताळ, सहायक निरीक्षक किरण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
