चार दिवसांपूर्वी पतीची आत्महत्या, विरहात पत्नीने उचलले टोकाचे पाऊल
बीड (15 ऑगस्ट 2025) : पतीने आत्महत्या केल्यानंतर पत्नीनेही विरहात आत्महत्या केली. ही घटना बीडमधील पाटोदा तालुक्यात घडली. नंदू नागरगोजे असे आत्महत्या केलेल्या पतीचे तर स्वाती नंदू नागरगोजे गर्जे (22) असे मृत विवाहितेचे नाव आहे. विशेष म्हणजे दाम्पत्याला तान्हूले बाळ आहे.
काय आहे नेमके प्रकरण
पाटोदा तालुक्यातील घुगेवाडी येथील नंदू नागरगोजे यांचा विवाह काही महिन्यांपूर्वी आष्टी तालुक्यातील खिळद येथील स्वाती गर्जे यांच्यासोबत झाला होता. हे दोघेही पुणे येथील शेवाळवाडी येथे राहत होते. स्वाती गर्भवती असल्याने तीन महिन्यांपूर्वी ती खिळद येथे तिच्या आई-वडिलांकडे राहण्यासाठी आली होती.





चार दिवसांपूर्वी स्वातीच्या पतीने नंदू नागरगोजे यांनी पुण्यातील त्यांच्या भाड्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पतीच्या अंत्यविधी आणि सावडण्याचे कार्यक्रम आटोपून कुटुंब बुधवारी खिळद येथील गावी परतले.
पतीच्या निधनाचा धक्का स्वातीला सहन झाला नाही. याच विरहातून तिने गुरुवारी पहाटे आपल्या काही दिवसांच्या तान्ह्या बाळाला घरात झोपलेले सोडून घरापासून जवळ असलेल्या एका विहिरीत उडी घेतली.
घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नामदेव सातव, पोलिस अंमलदार शिवदास केदार आणि कृष्णा लव्हारे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला आणि धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
