भुसावळातील वाहनधारकांना मोठा दिलासा : बसस्थानक मार्ग वाहतुकीसाठी खुला
मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते रस्त्याचे लोकार्पण : वाहन धारकांना मोठा दिलासा
Big relief for vehicle owners in Bhusawal : Bus stand road open for traffic भुसावळ (17 ऑगस्ट 2025) : भुसावळातील वाहनधारकांना रविवारी सर्वात मोठा दिलासा मिळाला. बाजारपेठ पोलिस ठाणे ते अमर स्टोअर्स या रस्त्याचे काँक्रिटीकरण होत असल्याने एक महिन्यापासून बंद असलेला रस्ता अखेर खुला झाल्याने वाहन धारकांना मोठा दिलासा मिळाला. मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले.
वाहनधारकांना मोठा दिलासा
हा रस्ता वाहतुकीला रस्ता मोकळा झाल्याने नागरिक व वाहनधारकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. बाजारपेठ पोलिस ठाणे ते अमर स्टोअर्सपर्यतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले असल्याने या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणावर दिड कोटी रूपयांचा खर्च झाला. काँक्रिटीकरणाच्या काळात हा रस्ता वाहतुकीला बंद होता, यामुळे बसस्थानकातून बस पंधरा बंगला मार्गे महामार्गाने वापर करीत होत्या. परिणामी प्रवाशांना अधीक भाडे मोजावे लागत होते. 16 जुलै पासून हा मार्ग वाहतूकीला बंद केला होता. त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे रविवारी मंत्री संजय सावकारे यांनी येथे फित कापून रस्त्याचे लोकार्पण केले. यावेळी मुख्याधिकारी राजेद्र फातले यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

चौक झाला मोठा
काँक्रिटीकरणाचे काम सुरू असतांनाच बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोरील चौक सुध्दा काँक्रिटीकरण करण्यात आल्याने चौक मोठा झाला. या काळात तिन्ही बोगदे वाहतूकीला बंद ठेवण्यात आले होते, रविवारपासून हे बोगदे वाहतूकीला पूर्ववत सुरू झाले आहे. दरम्यान, सोमवारपासून बसेस या नियोजित बसस्थानकावर येणार असल्याने आता प्रवाशांना वाढीव भाड्याचा भूर्दंड टळणार असून त्यांची गैरसोयही कमी होणार आहे.




