हतनूर धरणाचे 20 दरवाजे उघडले ; एक लाख 24 हजार क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात
20 gates of Hatnur Dam opened ; One lakh 24 thousand cusecs released into the riverbed भुसावळ (20 ऑगस्ट 2025) : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरण पातळीत वाढ होताच बुधवार, 20 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता हतनूर धरणातून 3517 क्युमेक्स (124203 क्युसेक्स) इतका प्रवाह नदीपात्रात सोडण्यात आला आहे. यासाठी धरणाचे एकूण 20 गेट पूर्णपणे उघडण्यात आल्याची माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली.
सरासरी 47.7 मिमी पावसाची नोंद
मध्य प्रदेश व विदर्भात झालेल्या जोरदार पावसामुळे तापी व पूर्णा नदीला पूर आला. यामुळे हतनूरमध्ये पाण्याची आवक वाढली. सोमवारनंतर मंगळवारी व बुधवारी सलग दुसर्या-तिसर्या दिवशी हतनूरमधून मोठा विसर्ग झाला.

पाणलोट क्षेत्रात येणार्या मध्य प्रदेश व विदर्भात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणाची जलपातळी वाढली आहे. यामुळे यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक विसर्ग मंगळवारी-बुधवारी करण्यात आला.
सोमवारी धरणाचे 6 दरवाजे पूर्ण तर 14 दरवाजे एक मीटरने असे एकूण 20 दरवाजांतून प्रतिसेकंद 64 हजार 732 क्युसेक वेगाने विसर्ग झाला होता. यानंतर मंगळवारी 24 दरवाजे पूर्ण तर 6 दरवाजे एक मीटर अशा एकूण 30 दरवाजांमधून विसर्ग झाला. नदीकाठावरील गावांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन उपविभागीय अभियंता एस. जी. चौधरी यांनी केले.
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये एकूण 429.0, तर सरासरी 47.7 मिमी पावसाची नोंद झाली. टेक्सा येथे सर्वाधिक 124.4 मिमी, बर्हाणपूर 25.2, देडतलाई 92.6, एरडी 14.2, गोपाळखेडा 49.4, चिखलदरा 11.8, लखपुरी 52, लोहारा 29.2 आणि अकोला येथे 30.2 मिमी पाऊस झाला.




