रस्ता खड्डेमुक्त झाला मात्र मुसळधार पावसाने भुसावळातील लोखंडी पूल, जामनेर रोडवर पाण्याचे तळे
भुसावळ (22 ऑगस्ट 2025) : शहरात गुरुवारी दुपारी 4.15 वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.शहरात तासभर झालेल्या पावसाची 22.2 इतकी पावसाची नोंद करण्यात आली. सकाळपासून उन्ह पडलेले होते. दुपारी अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या काही मिनिटांत पावसाचा जोर इतका वाढला की दहा फुटांवरचे सुद्धा स्पष्ट दिसत नव्हते. यामुळे शहरात विविध भागात पाण्याचे तळे साचले होते. यातून वाहनधारकांनी मार्ग काढत घर गाठले.
मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील फळ विक्रेते, भाजी विक्रेते व छोट्या व्यापार्यांना आपापल्या गाड्या व दुकाने आवरताना धावपळ करावी लागली. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना अडचणींना सामोरे जावे लागले.
पावसाचा मारा, वाहनधारक त्रस्त
पावसामुळे नागरिकांची एकच लगबग उडाली. जळगाव रोडवरील गुरुकुल ते साकेगाव या परिसरात पावसाचा विशेषतः मोठा मारा झाला. तेथे दहा फुटावरील सुध्दा दिसत नसल्याचे वाहन चालकांनी सांगितले. संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पावसाची तीव्रता कमी झाली. मुसळधार पावसामुळे शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

नागरिकांनी पावसाचा अनपेक्षित आनंद लुटला असला तरी रस्त्यांवर झालेल्या पाणीसाठ्यामुळे वाहतुकीत काही काळ अडथळा निर्माण झाला. बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोरील बोगद्यांमध्ये 2 ते 3 फुट पाणी साचले होते, तर जामनेर रोडवरील विविध भागात पाणी साचले होते, पांडुरंग टॉकीजजवळ सुध्दा पाण्याचे तळे निर्माण झाले होते, बसस्थानकात प्रवाशांची धावपळ झाली.




