जीवघेण्या खड्यांनी पोखरला भुसावळ-यावल मार्ग
शनी मंदिर परिसरात अपघात : नागरिक त्रस्त
भुसावळ (23 ऑगस्ट 2025) : भुसावळ-यावल मार्गावरील अंजाळे येथून वाघळूद पर्यंतचा रस्ता मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांनी विद्रुप झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या खड्यांमध्ये पाणी साचत आहे. रात्रीच्या वेळी मोटरसायकलस्वारांना अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः अंजाळजवळील शनी मंदिर परिसरातील खड्डे जीवघेणे ठरत आहेत. गुरुवारी रात्री याच ठिकाणी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. वाहनधारकांनी त्याला उचलून मदत केली.
खड्ड्यांमुळे वाढले अपघात
यावल जवळील पाठचारी ते पेट्रोल पंपापर्यंतच्या रस्त्यावरही खड्ड्यांनी अक्षरशः थैमान घातले आहे. अंधारात हे खड्डे न दिसल्याने वाहनधारक थेट त्यात अडकत असून, जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. नागरिकांमध्ये याबाबत संताप व्यक्त होत आहे. गेल्या महिन्यात या रस्त्यांचे ठेकेदारामार्फत डांबरीकरण करण्यात आले होते.मात्र निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने पावसाच्या पहिल्याच सरींनी दुरूस्ती उखडली आणि रस्ता पुन्हा खड्डेमय झाला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांची कामकाजावरील निष्काळजीपणा उघड झाला आहे.

नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवून संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी केली आहे. तसेच आमदार अमोल जावळे यांनी या प्रश्नात लक्ष घालून नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर करावी,अशी अपेक्षा वाहन धारकांकडून व्यक्त होत आहे.




