भुसावळात 712 विद्यार्थ्यांनी दोन तासात साकारले शाडू मातीचे गणपती बाप्पा
रोटरी क्लब ऑफ रेलसिटी, इनरव्हिल क्लब भुसावळ रेल सिटी, सोनिच्छा ड्रॉईंग क्लास संस्थांचा पुढाकार
भुसावळ (24 ऑगस्ट 2025) : शहरात प्रतिष्ठा महिला मंडळ, रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी, इनर व्हिल क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी आणि सोनिच्छा ड्रॉईंग क्लास, दिव्य मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी संतोषी माता हॉलमध्ये शाडू मातीचे गणपती बाप्पा बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या उपक्रमात शहरातील विविध शाळांमधील तब्बल 712 विद्यार्थ्यांनी शाडूमातीचे गणपती बाप्पा मूर्ती साकारली.
यांची होती उपस्थिती
खिरोद्यातील सप्तपुट ललित कला विद्यालयाचे प्राचार्य अतुल मालखेडे यांनी मुलांना गणपती बाप्पाची मूर्ती बनविण्याचे प्रात्याक्षिक करून मुलांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे होते. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची माहिती दिली. आपल्या घरी पीओपीची गणपती मूर्ती न बसवता आपण तयार केलेले शाडू मातीच्या गणपतीची स्थापना करावी, असे आवाहन त्यांनी केले. सहभागी मुलांना प्रमाणपत्र देण्यात आले. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे मूर्ती साकारण्यासाठी शाडू मातीचे तयार गोळे देण्यात आले.

गणेशोत्सव पर्यावरण संवर्धन उत्सव व्हावा
पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठी शाडू मातीचे गणपती तयार करणे हे काळाची गरज आहे. आपली संस्कृती आपल्या घरापासून जोपासली पाहिजे, हाच संदेश या कार्यशाळेतून दिला गेला आहे, असे मत यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिला. या कार्यशाळेचे आयोजक व सहभागी विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठी खर्या अर्थाने सुरवात केली आहे. गणेशोत्सव हा राज्य उत्सव आहे, असे शासनाने घोषित केले आहे. हा उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा र्हास होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण केले तर आपलेही रक्षण होईल. वातावरणात होणारे बदल हे थांबवण्यात मदत होईल, मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले.

मातीची मूर्ती घरीच विसर्जनाचे आवाहन
दैनिक दिव्य मराठीच्या उपक्रमाला प्रतिष्ठा महिला मंडळ, रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी, इनर व्हिल क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी आणि सोनिच्छा ड्रॉईंग क्लास या संस्थांनी या अभियानाला पाठबळ दिले. उपक्रमातून साकारण्यात आलेल्या शाडू मातीच्या गणरायाच्या मुर्तींचीच स्थापना करुन त्यांचे घरीच विसर्जन करण्याचे आवाहन यावेळी आयोजकांनी केले.
यांनी केले सहकार्य
या अभियानात जयश्री चौधरी, अनिता आंबेकर, सोनल महाजन, वैशाली सैतवाल,राजश्री बादशाह,हिमाली फालक,ज्योती राठोड, सीमा सोनार, योगिता वायकोळे, रोटरीचे अध्यक्ष देवेंद्र वाणी, सेक्रेटरी हरमीत सिंग माखन, विकास पाचपांडे, संदीप जोशी आदींसह सहयोगी संस्थांच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांनी सहकार्य केले.
250 मुर्त्यांमध्ये तुळशीच्या बिया
दिव्य मराठीच्या मातीचे गणपती घरीच विसर्जन या उपक्रमांतर्गत प्रतिष्ठा महिला मंडळ व सहयोगी संस्थांनी घेतलेल्या कार्यशाळेत साकारण्यात आलेल्या 250 मुर्त्यांमध्ये तुळशीसह विविध झाडाच्या बिया टाकण्यात आल्या होत्या. बाप्पाचे घरीच बादलीत विसर्जन केल्यानंतर या बियांचे रोपटे होणार आहे. यामुळे पर्यावरण संतुलीत होण्यास मदत होईल.
पर्यावरणाचे महत्व समजेल
मातीच्या गणपतीचे घरीच विसर्जन या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणासोबतच मुलांना कलात्मकतेची गोडी निर्माण झाली. मुलांच्या चेहर्यावरील नवनिर्मितीचा आनंद सुखावह होता. मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळाला, असे प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे म्हणाल्या.
भावी पिढी पर्यावरणपूरक राहिल
सध्या मुलांच्या हाती मोबाईलच दिसतो. कार्यशाळेच्या निमित्ताने मुले पर्यावरण संरक्षण, कला या गोष्टीसोबत जोडले गेले. भावी पिढी चांगला बोध घेईल. या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद बदलाची नांदी ठरेल, असे रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचे अध्यक्ष देवेंद्र वाणी म्हणाले.
मुलांमध्ये कला रुजली
मातीचे गणपती साकारण्याच्या उपक्रमातून मुलांमध्ये कला रुजते. सोबतच पर्यावरण पुरक गणेशोत्सवाची स्वत: कृतीतून माहिती मिळते. यामुळे हा उपक्रम महत्वाचा असल्याचे सोनिच्छा ड्रॉईंग क्लासच्या संचालिका जयश्री चौधरी म्हणाल्या.
घरीच विसर्जन व्हावे
पर्यावरण पुरक गणेशोत्सव ही आजच्या काळातील गरज आहे. पीओपीच्या मुर्तीमुळे होणारे प्रदूषण कमी होणे आवश्यक आहे. यामुळे घराघरात मातीचे गणपती स्थापन करुन घरीच विसर्जन व्हावे, असे इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी सेक्रेटरी योगिता वायकोळे म्हणाल्या.




