भुसावळातील ‘शिवमुद्रा प्रतिष्ठान’ ने साकारली वृंदावन प्रेम मंदिराची 60 फूट उंच प्रतिकृती

गणेशोत्सवात भाविकांसाठी विशेष आकर्षण : ढोल पथकासह सामाजिक उपक्रमांची मेजवानी


‘Shivamudra Pratishthan’ in Bhusawal creates 60 feet tall replica of Vrindavan Prem Mandir भुसावळ (25 ऑगस्ट 2025) : भुसावळ शहरातील शिवमुद्रा प्रतिष्ठान यंदा गणेशोत्सवात भाविकांना आगळा-वेगळा धार्मिक आणि सांस्कृतिक अनुभव देण्यासाठी वृंदावन येथील प्रसिध्द प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारली आहे. या मंडपाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 60 फूट उंच कळस. पश्चिम बंगालमधील सुमारे 20 कुशल कारागीर मागील दोन महिन्यांपासून या प्रतिकृतीचे काम करीत असून एकूण 20 हजार चौरस फूट जागेत 5 हजार चौरस फूट जागेत गणेशमूर्तीची स्थापना होणार आहे.

75 सदस्यांचे भव्य ढोल पथक
शिवमुद्रा प्रतिष्ठानकडे 75 सदस्यांचे स्वतःचे भव्य ढोल पथक आहे. युवक, युवती, महिला आणि लहान मुलांचा यात समावेश असून पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाचे स्वागत व विसर्जन करण्यात येते. हा ढोल-ताशांचा जल्लोष नागरिकांसाठी दरवर्षीचे आकर्षण ठरतो.


कीर्तन-प्रवचनाचे आयोजन
गणेशोत्सव काळात प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी विविध उपक्रम राबवते. रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, क्रीडा स्पर्धा, अथर्वशीर्ष पठण, व्याख्यानमाला अशा कार्यक्रमांबरोबरच इस्कॉनतर्फे प्रवचन व कीर्तनाचे आयोजन केले असून भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे.

फक्त उत्सवापुरतेच नव्हे तर वर्षभर प्रतिष्ठान सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम घेते. कबड्डी सामने, युवकांसाठी प्रशिक्षणवर्ग, हनुमान चालीसा दर्शनीवारी यासारखे उपक्रम प्रतिष्ठानतर्फे होत राहतात.

सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा उद्देश
अध्यक्ष उमेश इंगळे, उपाध्यक्ष प्रथमेश पवार, सचिव वरुण इंगळे, खजिनदार प्रजय चौधरी यांच्यासह 50 कार्यकर्ते या आयोजनासाठी मेहनत घेत आहेत. समाजासाठी काहीतरी वेगळे करावे व सामाजिक बांधिलकी जोपासावी हा आमचा उद्देश आहे. गणेशोत्सव हे त्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे, असे सचिव वरुण इंगळे यांनी सांगितले.

शहरातील नागरिकांसाठी यंदाचा उत्सव धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संदेश देणारा ठरणार आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !