कपिल व धीरज वाधवान सीबीआय कोठडीत
मुंबई : लॉकडाऊनचा आदेश डावलून महाबळेश्वरपर्यंतचा प्रवास केल्याबद्दल वादात अडकलेले कपिल आणि धीरज वाधवान यांना सीबीआय विशेष न्यायालयाने 29 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. डीएचएफएल आणि येस बँक गैरव्यवहारातील आरोपी आणि जामीनावर असतानाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाबळेश्वर पर्यंतचा प्रवास केला होता. कुख्यात गँगस्टर इक्बाल मिर्चीची मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी ईडीने जानेवारीत कपिल वाधवानला अटक केली होती. मनी लॉन्ड्रिंग अॅक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र फेब्रुवारी महिन्यात सत्र न्यायालयानं वाधवान यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर देशभरात कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव पाहता टाळेबंदी जाहीर करण्यात आली असतानाही जामिनावर असलेले उद्योगपती कपिल वाधवान, त्यांचे कुटुंबीय आणि नोकरचाकर अशा एकूण 23 जणांनी 8 आणि 9 एप्रिलला पाच गाड्यातून राज्यांतर्गत प्रवास केला. विशेष म्हणजे या प्रवासासाठी त्यांना राज्याच्या गृह विभागातील प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी त्यांना स्वत:च्या लेटरहेडवर पत्र दिले होते. जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी वाधवान यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.