दगडी बँक केवळ इमारत नाही तर बँकेची ओळख व वारसा : विक्रीचा निर्णय अन्यायकारक : माजी मंत्री एकनाथराव खडसे

Dagdi Bank is not just a building but the identity and heritage of the bank : The decision to sell is unjust : Former Minister Eknathrao Khadse जळगाव (4 ऑक्टोबर 2025) : जळगाव जिल्हा बँकेची ऐतिहासिक ‘दगडी बँक’ विक्रीस काढण्याचा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. त्यांनी जारी केलेल्या पत्रकात बँकेतील कर्मचार्यांची होणारी भरती पारदर्शक एजन्सीमार्फतच करण्यावरही भर दिला आहे.
कर्जाचा बोजा नसताना विक्रीचा अट्टहास का ?
जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी बुधवार, 1 रोजी पत्रकार परिषदेत, यापूर्वी विविध सहकारी संस्था विक्रीस काढल्या गेल्या तेव्हा विरोध झाला नव्हता का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर आमदार खडसे यांनी प्रत्युत्तर देताना, दगडी बँकेची इमारत ही बँकेची स्वतःची मालमत्ता असून तिची बाजारातील किंमत किमान 65 कोटी रुपये इतकी आहे. त्या इमारतीवर कोणतेही कर्ज नसताना विक्रीचा निर्णय घेण्याचा अधिकार संचालक मंडळाला कोणी दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
खडसे म्हणाले, पूर्वजांनी कमावलेली मालमत्ता विकणे हा चुकीचा निर्णय आहे. दगडी बँक ही केवळ इमारत नाही, तर ती बँकेची ओळख आणि वारसा आहे. लाखो शेतकरी आणि खातेदार या वास्तूसोबत भावनिकदृष्ट्या जोडले गेले आहेत.
बँकेतील भरती प्रक्रियेबाबत त्यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकारने जिल्हा बँकेतील 220 जागांच्या भरतीस मान्यता दिली आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र ही भरती आयबीएपीएस सारख्या 100 टक्के पारदर्शक एजन्सीमार्फतच व्हावी. मागील वेळी अशाच प्रक्रियेद्वारे 250 पेक्षा जास्त भरती झाली असून एकाही तक्रारीचा प्रसंग आला नाही. आगामी 300 जागांसाठी होणारी भरतीही याच पद्धतीने व्हावी, अन्यथा शिफारस व वशिलेबाजीला स्थान दिले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
याचबरोबर, काही सचिवांकडून उमेदवारांकडून 20 हजार रुपये मागितल्याच्या तक्रारी मिळाल्याचेही खडसे म्हणाले. अशा प्रकारच्या गैरव्यवहारांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
