जळगावातील तरुणाचा खून अनैतिक संबंधातून : दोघांना अटक
A young man was murdered in Jalgaon due to an illicit affair : two arrested जळगाव (15 डिसेंबर 2025) : जळगावच्या निमखेडी शिवारात सागर साहेबराव सोनवणे (30) या तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या खूनामागे महिलेसोबत असलेले अनैतिक संबंध समोर आले असून या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल होताच त्यांना अटक करण्यात आली. खुनाची घटना रविवार, 15 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली.
अनैतिक संबंधाच्या वादातून खून
मयत सागर सोनवणे हा आई-वडील आणि भावासह याच परिसरात वास्तव्याला होता. गेल्या जवळपास चार वर्षांपासून सागरचे परिसरातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. यामुळे कुटुंबात आणि परिसरात अनेकदा वाद झाले होते. सागरच्या नातेवाईकांनी त्याला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला मात्र या महिलेच्या कारणावरून सागर सोनवणे आणि निमखेडी येथील रहिवासी अनिल उर्फ शेट्टी सखाराम नन्नवरे यांच्यात वारंवार वाद होत होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, रविवारी सायंकाळी सहा वाजता अनिल उर्फ शेट्टी नन्नवरे आणि संदीप छगन बाविस्कर (दोघे रा.निमखेडी) यांच्यात सागरसोबत पुन्हा एकदा जोरदार बाचाबाची झाली व धमकीही देण्यात आली.


रात्रीच्या सुमारास केला खून
सायंकाळच्या या धमकीनंतर काही तासांतच रात्री 10 वाजण्याच्या सुमारास निमखेडी परिसरातील राम मंदिराच्या आसपास अनैतिक संबंधाच्या जुन्या वादातून आरोपींनी सागर सोनवणे याला गाठले. कोणताही विचार न करता, अनिल नन्नवरे आणि संदीप बाविस्कर यांनी सागरवर धारदार आणि तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी होऊन सागर जागीच मयत झाला.
कुटूंबियांचा मन हेलावणारा आक्रोश
खुनाची माहिती मिळताच सागरचा भाऊ विशाल सोनवणे आणि इतर नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागरला खाजगी वाहनाने तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीअंती सागरला मयत घोषित केले. यावेळी सागरच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
दोन आरोपींना अटक
मयताचा भाऊ विशाल सोनवणे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी अनिल उर्फ शेट्टी सखाराम नन्नवरे आणि संदीप छगन बाविस्कर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला व दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली.







