भुसावळ गोळीबाराने हादरले : 39 वर्षीय प्रौढ गंभीर जखमी
Bhusawal shaken by shooting : 39-year-old man seriously injured भुसावळ (17 डिसेंबर 2025) : पानटपरीच्या आडोशाला असलेल्या तरुणाला लुटण्याच्या उद्देशातून झालेल्या झटापटीनंतर संशयीतांनी त्याच्यावर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी उशिरा घडली. या घटनेत उल्हास गणेश पाटील (39) हे प्रौढ गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जळगावात शर्थीचे उपचार सुरू आहेत.
काय घडले भुसावळात ?
भुसावळच्या जळगाव नाका परिसरातून खळवाडीकडे जाणार्या पुलाच्या बाजूला स्व.नारायण पाटील व्यापारी संकुल आहे. या संकुलाजवळ असलेल्या पान टपरीच्या आडोशाला उल्हास पाटील हे उभे असताना दुचाकीवरून आलेल्या चौघांनी टपरीजवळ गोंधळ घालण्यास सुरुवात केली व रोकड हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी उल्हास गणेश पाटील यांनी संशयीताना विरोध केल्यानंतर एकाने सोबत आणलेल्या कट्ट्यातून एक गोळी झाडल्याने ती उल्हास पाटील यांच्या उजव्या खांद्याजवळ लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. गोळीबारानंतर या भागात मोठी घबराट पसरून पळापळ झाली.


संशयीत लागलीच पसार
गोळीबारानंतर चौघेही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. गोळीचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत पाटील यांना शहरातील खाजगी रुग्णालयात व तेथून जळगावी हलवण्यात आले. अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, शहर पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे, फॉरेन्सिक टीमनी घटनास्थळी धाव घेतली.
रात्री उशिरापर्यंत संशयीतांचा कसून शोध
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संशयीतांची माहिती घेत त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. आरोपींना लवकरच अटक करू, असा विश्वास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी वर्तवला.







