यावल शहरात ‘कचरा कोंडी’ ; कर्मचारी संपाचा फटका
‘Waste crisis’ in Yawal city; the strike by sanitation workers takes its toll यावल (18 डिसेंबर 2025) : शहरात गेल्या दोन दिवसांपासून घंटागाडी येत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. घराघरातून जमा होणारा कचरा उचलला जात नसल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना नाईलाजाने कचरा रस्त्यावर टाकावा लागत आहे. परिसरात अस्वच्छता पसरली आहे. शहरात अनेक ठिकाणी कचर्याचे ढीग झाले असुन घंटागाडी कर्मचारी संपावर गेल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. यावल नगरपालिकेकडून तत्काळ संप मिटवून कचर्याची उचल करावी, अशी मागणी होत आहे.
कर्मचारी संपाचा फटका : शहरात सर्वत्र साचली घाण
शहरातील नगर पालिकेचे घंटागाडी कर्मचारी हे गेल्या दोन दिवसांपासून संपावर गेले आहे. परिणामी शहरातील कचर्याची उचल थांबली आहे. अनेक ठिकाणी नागरीक नाईलाजास्तव घराबाहेर कचरा टाकत असल्याने ठिकठिकाणी कचर्याचे ढीग साचले आहे. दुसरीकडे पालिकेकडून नियमितपणे स्वच्छता कर आकारला जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कचरा वेळेवर न उचलल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. डास, दुर्गंधींचा त्रास वाढत असल्याने यावल पालिका प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून घंटागाडी कर्मचार्यांचा संप मिटवत कचर्याची उचल करावी, अशी मागणी होत आहे.




ते कर्मचारी मक्तेदाराचे
शहरातील कचरा उचल करण्याचा मक्ता एका मक्तेदारास देण्यात आला आहे व संबंधीत मक्तेदार हा घंटागाडी चालक, कचरा उचल करणारे कामगार यांना अत्यल्प मजुरी देत असून मजुरीत वाढ व्हावी या मागणीकरीता कर्मचारी संपावर गेले आहेत व संपूर्ण घंटागाड्या या शहरातील जलशुध्दीकरण केंद्राच्या आवारात लावण्यात आल्या आहे.
मक्तेदारास दिल्या सूचना
कचरा व्दार संकलनाकरीता मक्ता देण्यात आला असून मक्तेदाराने घंटागाडीवर रोजंदारीतत्वावर कर्मचारी नेमले आहे. मक्तेदार व कर्मचारी असा मजुरी वाढ वरून वाद आहे व कर्मचारी संप करीत आहेत. नगरपरिषदेकडून मक्तेदारास सक्त सूचना करून संप मागे घेेत काम सुरू करण्याचे सांगितल्याचे यावल आरोग्य निरीक्षक संग्राम शेळके म्हणाले.