अटकेसाठी नाशिक पोलिस येताच कोकाटेंचा ‘बीपी हाय’ : आज अँजिओग्राफी होण्याची शक्यता


When Nashik police arrived to arrest him, Kokate’s blood pressure shot up; he is likely to undergo angiography today मुंबई (19 डिसेंबर 2025) : नाशिकमधील बहुचर्चित सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरताच राज्याचे माणिकराव कोकाटे यांच्याकडून पक्षाने मंत्री पदाचा राजीनामा घेतला तर न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिस पोहोचल्यानंतर कोकाटेंचा दुसरीकडे बीपी हाय झाल्याने त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आज त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने अँजीओग्राफी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाला आता राजकीय, कायदेशीर आणि वैद्यकीय असे तिन्ही पैलू समोर आले आहेत.

बीपी वाढताच मुंबईत दाखल
न्यायालयाच्या निकालानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर तातडीने अटकेची टांगती तलवार असल्याने नाशिक पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले मात्र, कोकाटे सध्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याने अटक प्रक्रियेबाबत तात्पुरती अनिश्चितता निर्माण झाली आहे. डॉक्टरांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कोकाटेंचा उच्च रक्तदाब नियंत्रणात नसून त्यांना पूर्ण विश्रांतीची आवश्यकता आहे त्यामुळे पुढील काही दिवस त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. याच पार्श्वभूमीवर नॉन-बेलेबल वॉरंटची अंमलबजावणी थेट रुग्णालयातच केली जाऊ शकते का, यावर सध्या कायदेशीर सल्लामसलत सुरू आहे.



अटक की दिलासा ? राज्याचे लागले लक्ष
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वैद्यकीय तपासणीनंतरच त्यांच्या प्रकृतीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असून, त्यानंतर डिस्चार्जबाबत निर्णय होणार आहे. अँजिओग्राफीचा अहवाल आल्यानंतर पोलिस आणि डॉक्टरांमध्ये पुढील कारवाईबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे कोकाटेंवर तातडीने अटक होणार की काही काळ दिलासा मिळणार, हे पूर्णपणे वैद्यकीय अहवालावर अवलंबून आहे. या संपूर्ण प्रक्रियेत न्यायालयीन आदेशांचे काटेकोर पालन करण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

उपचाराचे मागवले अहवाल
या प्रकरणात नाशिक पोलिसांनी लिलावती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांचे जबाब नोंदवले असून, उपचारासंदर्भातील सर्व अहवाल मागवण्यात आले आहेत. रात्रपाळीचे प्रभारी डॉक्टर कुलदीप देवरे यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. नाशिकहून आलेल्या पोलिस पथकात महिला पोलिस नसल्याने वांद्रे पोलिसांकडून सहकार्य घेतले जात आहे. रुग्णालय प्रशासनानेही न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याचे आश्वासन दिले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एकूण 13 सदस्यांचे पोलिस पथक, ज्यामध्ये तीन अधिकारी आणि दहा हवालदारांचा समावेश आहे, सध्या मुंबईत तैनात आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !