भुसावळातील गुन्हेगारी थोपवणार : बेकायदेशीर पिस्तुल एजंटावर कायद्याचा बडगा : नूतन डीवायएसपी केदार बारबोले
Crime in Bhusawal will be curbed: Legal action against illegal pistol agents: New DySP Kedar Barbole भुसावळ (30 डिसेंबर 2025) : कायदा हा सर्वांसाठी समान असल्याने गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होणे आवश्यक आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी कायद्याच्या आधारेच कठोर कारवाई केली जाईल, असा ठाम निर्धार नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी व्यक्त केला.
डीवायएसपी संदीप गावित यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नियोजन स्पष्ट केले.
गुन्हेगारांची खैर नाही
शहर व बाजारपेठ पोलीस ठाणे तसेच तालुका व नशिराबाद पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारीचा प्राथमिक आढावा नूतन उपअधीक्षकांनी घैतला शिवाय प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय गुन्हेगारांची सविस्तर माहिती संकलीत केली. कुणा-कुणावर कोणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, कोण हद्दपार आहे, याचा अभ्यास करून गुन्हेगारांवर धडक कारवाई केली जाईल, असे बारबोले यांनी सांगितले.

पिस्तूल विक्रेत्यांसह बाळगणार्यांवर होणार कारवाई
शहरात अलीकडे घडलेल्या गोळीबाराच्या घटनांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या घटना प्रामुख्याने वैरभावातून किंवा बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. शहरात बेकायदेशीर पिस्तुले कुठून येतात, त्यामागील साखळी व एजंट कोण आहेत, याचा शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.
अधिकार्यांची बैठक : गुन्हेगारीचा आढावा
पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्यासह तालुका व नशिराबाद पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांची बैठक घेऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारीची माहिती घेतल्याचे त्यांनी सांगितले. शहरात शांतता नांदावी, सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे यासाठी समाजातील सज्जन नागरिकांशी संवाद साधला जाईल. कर्तव्य बजावत असताना कायदा हाच सर्वात मोठा आहे, हे डोळ्यासमोर ठेवून काम केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गुन्हेगारांचे स्वतंत्र रेकॉर्ड तयार करण्यात येणार असून, त्याच्या आधारे पुढील काळात कठोर कारवाईचे नियोजन केले जाईल. येत्या आठवडाभरात दोन्ही पोलीस ठाण्यांतील गुन्हेगारांचा सखोल आढावा घेऊन पुढील कृती आराखडा तयार केला जाणार असल्याचे डीवायएसपी बारबोले यांनी सांगितले.
