भुसावळात 75 मद्यपींची पोलिसांनी उतरवली ‘झिंग’

नाकाबंदीत 338 वाहनधारकांवर कारवाईचा बडगा


In Bhusawal, the police sobered up 75 intoxicated individuals भुसावळ (2 डिसेंबर 2026) : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या उत्साहाचे वातावरण शहरात निर्माण झाले होते. शहरातील विविध हॉटेल्स, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते, फास्टफूड गाड्या नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत्याफ तेथे खवय्यांची मोठीच गर्दी झाली. एकीकडे तरुणाईत जल्लोषाचे वातावरण दिसून येत असताना दुसरीकडे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या विशेष पथकांकडून नाकाबंदी करीत कारवाई करण्यात आली. 75 मद्यपी व 338 वाहनांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

कारवाईने उडाली खळबळ
शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. सुमारे 128 पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी शहरातील विविध ठिकाणी तैनात होते. मंगळवार, 30 पासूनच शहरात नाकाबंदी सुरू करण्यात आली. मद्यपान करून वाहन चालविणार्‍यांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. रात्री प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची गांधी पुतळ्यासह विविध पॉइंटवर तपासणी करण्यात आली.





338 वाहन धारकांवर कारवाई
भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उद्धव डमाळे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ व शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक उमेश महाले यांनी त्यांच्या-त्यांच्या कार्यक्षेत्रात धडक कारवाई राबवली. नाकाबंदीत वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणार्‍या 75 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली तर मोटार वाहन कायद्याच्या विविध तरतुदींचे उल्लंघन करणार्‍या 338 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे नववर्षाचा जल्लोष शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडला.

शहरातील प्रमुख ठिकाणी नाकाबंदी
गांधी पुतळा, हंबर्डीकर चौक (पाणी गेट), बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर, बसस्थानक परिसर, जामनेर रोड, खडका रोड, जळगाव रोडवरील वाय पॉइंट आदी ठिकाणी नाकाबंदी उभारण्यात आली. ये-जा करणार्‍या वाहनांची कागदपत्रे तपासली जात होती. नाकाबंदी अधिक प्रभावी राहावी, यासाठी दर दोन तासांनी नाकाबंदीचे ठिकाण बदलण्यात येत होते. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दित कुर्‍हा पानाचे येथेही नाकाबंदी करण्यात आली.

ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये 35 कारचा समावेश
नाकाबंदीत पोलिसांच्या रडारवर मद्यधुंद वाहन चालकांवर पोलिसांचा विशेष भर होता. संशयित वाहन चालकांची श्वास चाचणी करून तपासणी करण्यात आली. तसेच तीन सीट, धोकादायक वाहन चालविणे, कागदपत्रांचा अभाव आदी बाबींवरही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या 75 केसेसमध्ये 35 वाहने ही चारचाकी होती. कार चालकांविरूध्द कारवाई करण्यात आली तर उर्वरित मोयर सायकलस्वार यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

कारवाई सुरूच राहणार
शहरातील विविध भागात दररोज अजूनही चार दिवस नाकाबंदी ठेवली जाणार आहे, यात ड्रंक अँण्ड ड्राईव्हची मोहिम राबविली जाणार आहे. मध्य रात्रीपर्यत केलेल्या नाकाबंदीत दोन हजारांचा दंड वसूल केला असून 24 हजार रूपयांचा दंड ऑनलाईन करण्यात आला आहे. वाहनधारकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !