नाशिक कुंभमेळ्यासाठी रेल्वेचे अभेद्य सुरक्षा कवच : गर्दी नियंत्रणासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर
तीन हजारांपेक्षा जास्त जवान, अधिकारी असतील नियुक्त : 200 हून अधिक सीसीटीव्ही, स्वतंत्र कंट्रोल रूम उभारणार
Impenetrable security cover by the railways for the Nashik Kumbh Mela: AI technology to be used for crowd control भुसावळ (2 डिसेंबर 2026) : नाशिक येथे 2027 मध्ये होणार्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने आतापासूनच व्यापक आणि अत्याधूनिक सुरक्षा आराखडा अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे. लाखो भाविकांच्या सुरक्षितेसाठी देशभरातून तीन हजारांहून अधिक आरपीएफ (रेल्वे सुरक्षा बल) जवान व अधिकारी तैनात करण्यात येणार आहे. गर्दी नियंत्रणासाठी प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआर) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या सूत्रांनी दिली.
महानिरीक्षकांनी दिली भेट
आरपीएफचे महानिरीक्षक विवेक सागर यांनी नुकतीच नाशिक रोड, देवळाली आणि परिसरातील रेल्वे स्थानकांची पाहणी करून सुरक्षेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी वरिष्ठ सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. यावेळी नाशिक रोड रेल्वे स्थानकासह प्रवाशांना येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. आतापासूनच रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांना सुविधा आणि बंदोबस्ताचे नियोन केले जाणार आहे. प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी स्वतंत्र तिकीट खिडक्या सुरू केल्या जाणार आहे. यामुळे प्रवाशांना तिकीट काढण्यास गैरसोय होणार नाही.




24 तास पहारा : सीसीटीव्ही कॅमेर्यांची संख्या दुप्पट
कुंभमेळ्यादरम्यान होणारी अभूतपूर्व गर्दी लक्षात घेता रेल्वे स्थानकांवर तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. सीसीटीव्हीचे विस्तारित जाळे राहणार आहे. सध्या नाशिक रोड रेल्वे स्थानकावर 86 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. कुंभमेळ्याच्या काळात ही संख्या वाढवून 200 पेक्षा अधिक करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र हायटेक कंट्रोल रूम तयार केले जाणार आहे. सर्व प्रमुख स्थानकांवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अत्याधूनिक कंट्रोल रूम उभारण्यात येणार आहे. अनेक स्क्रीनद्वारे 24 तास थेट देखरेख केली जाणार आहे. कोणत्या प्लॅटफॉर्मवर किंवा परिसरात गर्दी वाढत आहे, याची माहिती अधिकार्यांना तत्काळ मिळणार आहे. यामुळे गर्दी वळवणे, गाड्यांचे नियोजन आणि चेंगरा-चेंगरीसारख्या घटना टाळणे शक्य होणार आहे.
कुंभमेळ्याआधी महिनाभर विशेष प्रशिक्षण
कुंभमेळ्यासाठी देशाच्या विविध रेल्वे झोनमधून येणार्या तीन हजार जवानांना कुंभमेळा सुरू होण्याच्या किमान एक महिना आधी नाशिकमध्ये तैनात केले जाणार आहे. या कालावधीत त्यांना-गर्दी नियंत्रण, आपत्कालीन परिस्थिती हाताळणे, भाविकांशी समन्वय व संवाद, महिला, वृद्ध आणि बाल भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष कार्यपद्धती यांचे सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. जवानांच्या निवास व भोजनाची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासन घेणार आहे. कुंभमेळ्यात कुठलीही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.
पाच महत्त्वाच्या स्थानकांवर ‘हाय अलर्ट’
कुंभमेळ्याच्या काळात नाशिक रोडसह परिसरातील उपनगरीय स्थानकांवरही मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने पाच स्थानकांवर विशेष हाय अलर्ट ठेवण्यात येणार आहे, सर्वच रेल्वे गाड्या या नाशिक रोड स्थानकावर न थांबविता जवळच्या स्थानकांवर थांबविणार आहे, यामुळे गर्दीचे विभाजन केले जाणार आहे. यात नाशिक रोड, देवळाली, कसबे सुकेणे, ओढा, खैरवाडी या स्थानकांचा समावेश असेल. या सर्व ठिकाणी आरपीएफ जवानांचा खडा पहारा, वाढीव सीसीटीव्ही आणि सतत गस्त ठेवली जाणार आहे.
मागील कुंभमेळ्याच्या अनुभवावर आधारित नवा आराखडा
मागील कुंभमेळ्यातील अनुभव आणि त्रुटींचा अभ्यास करून यावेळी अधिक प्रभावी सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस दल आणि महापालिकेसोबत समन्वय बैठक घेऊन उपाययोजना अधिक बळकट केल्या जातील. भाविकांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. गेल्या वेळेच्या कुंभमेळ्यात काय काय अडचणी आल्या होत्या, त्या दृष्टीने सुरक्षेचे उपाय आखले जाणार असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी म्हणाले.