भुसावळातील खाकीच्या शिलेदारांचा ‘टॉप कॉप ऑफ द मंथ’ पुरस्काराने गौरव
The police officers from Bhusawal were honored with the ‘Top Cop of the Month’ award भुसावळ (10 जानेवारी 2026) : भुसावळ उपविभाग अंतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या पोलीस अंमलदारांना दरमहा गौरवून प्रोत्साहन देण्यासाठी पोलीस स्टेशन टॉप कॉप ऑफ द मंथ ही संकल्पना राबविण्यात येते. हा उपक्रम जून 2023 पासून सुरू असून पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर अधीक्षक अशोक नखाते, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागात प्रभावीपणे अंमलात आणला जात आहे. याच पार्श्वभूमीवर नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात उत्कृष्ठ काम करणार्या पोलीस कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला. यामुळे पोलीस कर्मचार्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कामाची दखल घेत निवड
डीवायएसपी कार्यालयात झालेल्या या उपक्रमाचा उद्देश पोलीस दलातील अंमलदारांचे मनोबल वाढविणे, संघभावना दृढ करणे तसेच दैनंदिन कामकाजात उत्कृष्टतेची प्रेरणा देणे हा आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संबंधित महिन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्या अंमलदाराची निवड करतात.निवड झालेल्या अंमलदारांचा क्राईम आढावा बैठकीत पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव केला जातो, तसेच प्रत्येकी एक हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्याची शिफारस पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे करण्यात येते. त्यांची नावे व छायाचित्रे संबंधित पोलीस ठाण्याच्या दर्शनी भागात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात लावण्यात येतात.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास डीवायएसपी केदार बारबोले, पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे, निरीक्षक राहूल वाघ, निरीक्षक महेश गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक उमेश महालेंसह महिला अधिकारी तसेच सुमारे 50 पोलीस अंमलदार उपस्थित होते. नागरिकांना सौजन्यपूर्ण वागणूक, गुन्हे उघडकीस आणणे, दोषसिद्धीचे प्रमाण वाढविणे व समाजात पोलीस दलाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करणे, या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबविला जात असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी सांगितले. अन्य कर्मचार्यांनी सुध्दा चांगली कामे करून विभागाचे नाव उज्वल करावे, असे आवाहन डीवायएसपी बारबोले यांनी केले.
नोव्हेंबर-2025 साठी असे आहेत ‘टॉप कॉप’
शुक्रवार, 9 जानेवारी रोजी झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत अंमलदारांना गौरविण्यात आले. यात शहर पोलिस ठाण्यातील राहुल नारायण भोई यांनी गंभीर गुन्ह्यातील आरोपी अटक व मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला.
भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील कांतिलाल रघुनाथ केदारे यांनी गुन्हा निष्पन्न करून आरोपी अटक केली.
तालुका पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार संजय आत्माराम तायडे यांनी क्लिष्ट गुन्ह्यांच्या तपासात उल्लेखनीय योगदान दिले.
नशिराबाद पोलिस ठाण्यातील महिला कर्मचारी मोनाली रमेश दहिभाते यांनी गुन्ह्यांची सीसीटीएनएस प्रणालीत अचूक व वेळेवर नोंद केली.
भुसावळ शहर वाहतूक शाखेतील स्वप्नील पाटील यांनी मोटार वाहन कायद्याखाली एकूण 215 कारवाया केल्या.
डिसेंबर-2025 साठी ‘टॉप कॉप’
शहर पोलिस ठाण्यातील दीपक सुरेश कापडणे यांनी क्राईम व सांख्यिकी माहिती अद्यावत केली. बाजारपेठ पोलीस ठाण्यातील जीवन भास्कर कापडे यांनी गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाची मदत केली.
भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील जितेंद्र नाना साळुंके यांनी जुना गुन्हा निकालात लावून दोषसिद्धी केली. नशिराबाद पोलिस ठाण्यातील महिला पोलिस युगंधरा राहुल नारखेडे यांनी बारनिशी कामकाजात 90 टक्के अर्ज निर्गती केली.
भुसावळ शहर वाहतूक शाखेतील हवालदार सचिन रतन सपकाळे यांनी 80 ‘ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’प्रकरणे न्यायालयात सादर केली. याशिवाय शहर पोलीस ठाण्यातील काही गंभीर गुन्हे उघडकीस आणणार्या अधिकारी व अंमलदारांचा विशेष सत्कारही करण्यात आला.

