भुसावळसह वरणगावातील स्वीकृत नगरसेवकांसह उपनगराध्यक्षांची नावे आली समोर !
गणेश वाघ
The names of the nominated corporators from Bhusawal and Varangaon along with the deputy mayor, have been revealed ! भुसावळ (14 जानेवारी 2026) : भुसावळसह वरणगाव पालिकेसाठी उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया गुरुवार, 15 रोजी पार पडणार आहे. या पदांसाठी विविध नावांवर बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत खलबते सुरू असलीतरी राजकीय गोटातून समजलेल्या माहितीनुसार, वरणगावात उपनगराध्यक्षपदासाठी अरुणा इंगळे यांना संधी मिळणार असल्याचे निश्चित आहे तर भुसावळसाठी प्रिया बोधराज चौधरी, सोनल रमाकांत महाजन वा शैलजा नारखेडे यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी खास सूत्रांची माहिती आहे.
वरणगावात उपनगराध्यक्षपदी अरुणा इंगळेंना संधी
वरणगावच्या माजी नगराध्यक्षा अरुणा इंगळे यांना वरणगाव पालिकेत भाजपाकडे असलेल्या नगरसेवक संख्येच्या निकषानुसार उपनगराध्यक्षपद मिळणार आहे. भाजपातर्फे अरुणा इंगळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नगराध्यक्ष पदाचे पराभूत उमेदवार झाले स्वीकृत नगरसेवक
वरणगावात चुरशीच्या झालेल्या पालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपाच्या शामल झांबरे तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार राजेंद्र चौधरी यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळणार आहे. याबाबतचा निर्णय बुधवारी झाला असलातरी गुरुवारी निवडीनंतर याबाबत अधिक स्पष्टता येणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही तूल्यबळ उमेदवार वरणगावात नगराध्यक्ष पदासाठी इच्छूक होते मात्र जनतेचा कौल सुनील काळे यांना मिळाल्यानंतर दोघांचा पराभव झाल्याने त्यांना आता स्वीकृत नगरसेवक पदावर समाधान मानावे लागणार आहे.
भुसावळ उपनगराध्यक्षपदासाठी तीन नावे चर्चेत
भुसावळ पालिकेत उपनगराध्यक्ष पदावर कुणाची वर्णी लागणार? याबाबत बुधवारी सायंकाळपर्यंत सस्पेन्स कायम होता. मंत्री संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात भाजपेयी व नगरसेवकांची बैठक झाली मात्र संधी कुणाला मिळणार? याबाबत रात्री उशिरापर्यंत नाव जाहीर करण्यात आले नाही तर गुरुवारी नाव समोर येईल, असे सूत्रांनी सांगितले. ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ला खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया बोधराज चौधरी वा सोनल रमाकांत महाजन, शैलजा नारखेडे या एका नावावर शिक्कामोर्तब होवू शकते मात्र ऐनवेळी कुणाचे नाव समोर येते? याबाबत उत्सुकता कायम आहे.
भुसावळात यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी
दहा नगरसेवकांमागे एक स्वीकृत नगसेवक पद या निकषानुसार भाजपाकडे 27 नगरसेवकांचे संख्याबळ असल्याने भुसावळात भाजपाच्या वाटेला तीन स्वीकृत नगरसेवक पदे मिळाली आहेत. त्यात नितीन बाबूराव धांडे, डॉ.प्रसाद वासुदेव बोंडे व संजयकुमार सुशीलकुमार नाहाटा यांना संधी मिळणार आहे.
संतोष दाढींची लागणार वर्णी
शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अपक्ष गटातील सहा नगरसेवकांसाठी एक स्वीकृत नगरसेवक पद मिळणार आहे. या गटातर्फे संतोष दाढी चौधरी यांना संधी निश्चित आहे.
माजी आमदार संतोष चौधरी स्वीकृत नगरसेवक
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे 14 नगरसेवकांची नोंदणी झाल्याने त्यांच्या वाटेला एक नगरसेवक पद मिळणार आहे. माजी आमदार संतोष चौधरी हे स्वीकृत नगरसेवक होतील हे निश्चित आहे.

