आमदार एकनाथ खडसेंचा अजित पवारांवर पलटवार : भ्रष्टाचाराची माहिती दडवल्याने मग तुमचाही त्यात सहभाग का ?
MLA Eknath Khadse retaliates against Ajit Pawar: If you concealed information about corruption, then doesn’t that mean you were also involved? पुणे (14 जानेवारी 2026) : 1999 मधील भाजप आणि शिवसेना युती सरकारच्या काळात ‘पार्टी फंडा’साठी प्रकल्पांची किंमत वाढवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जोरदार पलटवार केला. एव्हढी वर्षे तुम्ही भ्रष्टाचाराची माहिती दडवून ठेवली, म्हणजे तुम्हीही त्यात सामील आहात का? असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित करत तुमच्याकडची फाईल आता सार्वजनिक कराच, असे आव्हान अजित पवारांना दिले.
नवा राजकीय वाद पेटला
महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत 25 वर्षांपूर्वीच्या सिंचन प्रकल्पावरून नवा राजकीय वाद पेटला आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याच्या आरोपांवरून भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, 1999 मध्ये जेव्हा मी जलसंपदा मंत्री झालो, तेव्हा पुणे जिल्ह्यातील ‘पुरंदर उपसा सिंचन योजने’ची फाईल माझ्याकडे आली. या प्रकल्पाची मूळ किंमत 200 कोटी असताना ती 310 कोटी दाखवण्यात आली चौकशी केली असता अधिकार्यांनी कबूल केले की, तत्कालीन सरकारने 100 कोटी रुपये पार्टी फंडासाठी मागितले होते आणि त्यात अधिकार्यांनी स्वतःचे 10 कोटी वाढवून किंमत 310 कोटी केली होती. ती फाईल आजही माझ्याकडे आहे.

खडसे म्हणाले मग तुम्ही 25 वर्ष भ्रष्टाचाराला का संरक्षण दिले ?
अजित पवारांच्या या आरोपांनंतर त्या काळात जलसंपदा मंत्री राहिलेल्या एकनाथ खडसे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. खडसे म्हणाले, अजित दादांना 25 वर्षांनंतर याची आठवण झाली का? जर तुम्हाला भ्रष्टाचाराची माहिती होती, तर 25 वर्षे ती का दडवली? याचा अर्थ तुम्ही भ्रष्टाचाराला संरक्षण दिले आहे.
100 कोटी वाढवण्यासाठी मूळ किंमत मोठी असायला हवी. पार्टी फंडासाठी एस्टिमेट वाढवणे किंवा अबव्ह टेंडर देणे असे प्रकार माझ्या काळात झाले नाहीत. अजितदादांनी केवळ मोघम बोलू नये. ती फाईल कोणती, तो प्रकल्प कोणता हे जनतेसमोर उघड करावे. ती फाईल सार्वजनिक करावी आणि सत्यता तपासून घ्यावी, असे आव्हान एकनाथ खडसे यांनी अजित पवारांना दिले.
निवडणूक काळात असे आरोप चुकीचे
सिंचन घोटाळ्याच्या आरोपावरून स्वतःवरचे लक्ष विचलित करण्यासाठी अजित पवार जुन्या प्रकरणांचा आधार घेत आहेत. दादांनी जर कारवाई केली नाही, तर त्याचा अर्थ त्यांनी तो भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे. आता केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे आरोप करणे चुकीचे आहे.

