जळगाव महापौरपदी दीपमाला काळे तर उपमहापौरपदी मनोज चौधरी
Deepmala Kale has been elected as the Mayor of Jalgaon and Manoj Chaudhary as the Deputy Mayor जळगाव (2 फेब्रुवारी 2026) : जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष लागून असलेल्या महापौर आणि उपमहापौर निवडीचा सस्पेन्स सोमवारी संपला. महायुतीकडून दोन्ही प्रतिष्ठेच्या पदांसाठी उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली. भाजपाच्या दीपमाला मनोज काळे (Mayor Deepmala Kale) यांची महापौरपदी तर शिंदेसेनेचे मनोज सुरेश चौधरी यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली.
46 जागांवर भाजपाचे वर्चस्व
भाजपाचे जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या जळगाव मनपा निवडणुकीत महायुतीने निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. भाजपने 46 पैकी 46 जागांवर आणि शिवसेनेने 23 पैकी 22 जागांवर विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला.
निवडणुकीनंतर महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. महापौरपद हे ‘ओबीसी महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे या पदावर कुणाची वर्णी लागते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
उज्ज्वला बेंडाळे व दीपमाला काळे यांचे नाव आघाडीवर होते मात्र, आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या वतीने दीपमाला काळे यांच्या नावावर पसंतीची मोहोर उमटवली. दुसरीकडे ठरलेल्या सूत्रानुसार उपमहापौरपद शिवसेनेकडे गेले असून प्रभाग-8 मधून बिनविरोध निवडून आलेले मनोज सुरेश चौधरी यांना या पदासाठी संधी देण्यात आली.
सोमवारी या नावाची अधिकृत घोषणा करताना मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंद्रकांत सोनावणे, आमदार मंगेश चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
जळगाव मनपाच्या इतिहासात ही निवड लक्षणीय ठरणार आहे. दीपमाला काळे आणि मनोज चौधरी हे दोघेही नगरसेवक म्हणून ‘बिनविरोध’ निवडून आले होते. आता महापौर आणि उपमहापौर म्हणूनही त्यांची ‘बिनविरोध’ झाली आहे.


