‘आम्ही भारतीय’ ही संकल्पना आजही रुजली नाही : जयसिंग वाघ
भुसावळ (शनिवार, 28 नोव्हेंबर 2026) : भारतीय संविधानाने ‘आम्ही भारतीय लोक’ ही संकल्पना मांडली आहे. संविधानाला लागू होऊन 76 वर्षे झाली मात्र भारत आजही जातीला, धर्माला प्रथम मानत आला आहे. केवळ जाती-धर्माच्या नावावर अनेकांना घटनात्मक अधिकारापासून वंचित ठेवले जात आहे. मतदान करतांना, गुन्हे दाखल करतांना, नोकरीकरीता निवड करतांना, उच्च दर्जाच्या शिक्षणात प्रवेश देताना प्रसंगी न्यायालयीन खटले चालवताना जात, धर्म हे प्रमुख घटक म्हणून पाहिले जाते. आम्ही भारतीय ही संकल्पना रुजुच शकली नाही, असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यीक जयसिंग वाघ यांनी केले.
अंधश्रद्धेमुळे गुलामीत राहिला भारत
दर्यापूर येथील अन्नपूर्णा नगरात संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता आयोजित कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते. जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात पुढं सांगितले की, भारत जाती, धर्मात , अंधश्रद्धेत अडकून राहिल्याने तो हजारो वर्षे परकियांच्या गुलामीत राहिला हे वास्तव आम्ही आजही मानायला तयार नाहीत. संविधानाकडं आम्ही पद्धतशीर दुर्लक्ष करून देशात जात, धर्म, अंधश्रद्धा अधिकाधिक घट्ट करत आहोत. धर्म, जातीसाठी आम्ही मारायला व मारायला तयार असतो. या मानसिकतेतून बाहेर पडून आम्ही समता, स्वातंत्र्य, बंधूता, व्यक्तीची प्रतिष्ठा ही तत्त्वं अंगीकारावी, असे आवाहन शेवटी वाघ यांनी केले
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी जगन्नाथ सुरवाडे (मुंबई) होते. त्यांनी संविधान निर्मितीच्या संबंधाने नेमण्यात आलेल्या विविध समित्यांची माहिती देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली प्रास्ताविक जे.जे.सोनवणे यांनी केले. सी.जी.निकम, कविता पवार, सायली तायडे, आनंदी तायडे यांनी मनोगत व्यक्त केले. उपसरपंच प्रधान मधुकर, चंद्रगुप्त सुरवाडे, महेंद्र तायडे, जे.डी.तायडे, शालिक निकम, रवींद्र बाविस्कर आदींसह स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
