भुसावळ पालिकेची उद्या पहिलीच सर्वसाधारण सभा
Bhusawal Municipality will hold its first general meeting tomorrow भुसावळ (2 फेब्रुवारी 2026) : नगरपालिकेत सत्तांतरण झाल्यानंतर पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा मंगळवार, 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता नगरपालिकेतील वरच्या मजल्यावर होत आहे. सभेसमोर तब्बल 249 विषय अजेंड्यावर घेतले असून सभेकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी राष्ट्रवादीने विरोधक भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागातील एकही विषय अजेंड्यावर घेतलेलस नाही तर दुसरीकडे अपक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना, काँग्रेसच्या नगरसेवक असलेल्या तब्बल 14 प्रभागातील विकासात्मक कामांचे विषय आहेत तर सभा किती वेळ चालते? सभेत नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
भाजपा नगरसेवकांच्या वॉर्डातील विषयांवर फुली
ज्या प्रभागात भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत, अशा 11 प्रभागांमधील एकही नगरसेवकांचे विकासात्मक विषय अजेंड्यावर नाही, यामुळे शहरातील राजकिय कुरघेाड्या वाढल्या आहेत. यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजपानेही त्यावेळी विरोधी असलेल्या राष्ट्रवादी नगरसेवकांच्या वॉर्डातील एकही विषय न घेतल्याने तोच कित्ता आत्ताच्या सत्ताधार्यांनी गिरवला आहे.
प्रभाग दोनमध्ये सर्वाधिक 42 विषय
पालिकेच्या आगामी सभेच्या अजेंड्यावर 249 विषय आहेत. यात सर्वाधिक 42 विषय हे एकट्या प्रभाग क्रमांक दोनमधील आहेत. प्रभाग क्रमांक तीनमध्ये 19 विषय आहेत. यासोबतच प्रभाग 2, 3, 8, 11 ते20 व 22 या प्रभागातील विकासात्मक कामांचे विषय अजेंड्यावर घेण्यात आले आहेत. भाजपचे नगरसेवक असलेल्या प्रभाग 1, 4,5 ते 7, 9, 10, 21, 23 ते 25 या प्रभागातील एकही विषय अजेंड्यावर नाही.
असे आहेत विषय
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संकूलातील न्यायालयाच्या आदेशान्वये 60 गाळे आरक्षीत ठेवून उर्वरित गाळ्यांचे ई ऑक्शन करणे, स्मशानभूमीत लाकडांचा पुरवठा करणे, तापी बंधार्याची कार्यात्तर मंजूरी घेवून डागडूजी करणे,कमी दाबाने पुरवठा होणार्या भागांसाठी बुस्टर पंप बसवणे, उन्हाळ्यात पाणबुडीव्दारे पाणी उचल करुन जॅकवेलपर्यंत पाणी पोचवणे, शहरातील अधिक रहदारी असलेल्या मार्गावर गतीरोधक बसवणे आदींसह अनेक विकासात्मक विषय घेण्यात आले आहेत. व्यासपीठावर नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, प्रभारी मुख्याधिकारी आदी उपस्थित असतील.


