ट्रम्प यांचे पंतप्रधानांनी मानले आभार : भारतावरील टॅरिफ 50 वरुन 18 टक्के
नवी दिल्ली (3 फेब्रुवारी 2026) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी भारतावरील रेसिप्रोकल टॅरिफ (परस्पर कर) 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार कराराची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती ती अखेर आज संपली आहे. ट्रम्प यांनी सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर रात्री सुमारे 10.30 वाजता ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यापार कराराची घोषणा केली.
ट्रम्प यांनी दावा केला की, मोदी रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवून अमेरिकेकडून अधिक तेल खरेदी करण्यास सहमत झाले आहेत.
ट्रम्प यांच्या मते, गरज पडल्यास भारत व्हेनेझुएलाकडून तेल घेईल. भारत ‘बाय अमेरिकन’ धोरणांतर्गत अमेरिकेकडून 46 लाख कोटी रुपये (500 अब्ज डॉलर) पेक्षा जास्त किंमतीचा माल खरेदी करेल तर ट्रम्प यांच्या घोषणेनंतर पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले – भारताच्या 1.4 अब्ज लोकांच्या वतीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार.
ट्रम्पने 25 एप्रिल रोजी भारतावर 25% रेसिप्रोकल टॅरिफ आणि नंतर रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे ऑगस्टमध्ये 25% दंड जाहीर केला होता. व्हाईट हाऊसच्या एका अधिकार्याने न्यूज एजन्सीला सांगितले की, भारतावर फक्त 18% टॅरिफच लागेल. अमेरिका रशियन तेल खरेदी केल्यामुळे लावलेला 25% टॅरिफ काढून टाकेल.
मोदींनी मानले ट्रम्प यांचे आभार
पंतप्रधान मोदींनी लिहिले की, मला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलून खूप आनंद झाला. मेड इन इंडिया उत्पादनांवरील शुल्क आता 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे, हे जाणून खूप समाधान वाटले. या शानदार निर्णयासाठी भारताच्या 1.4 अब्ज लोकांच्या वतीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मनःपूर्वक आभार.
मोदींनी पुढे लिहिले- जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही एकत्र काम करतात, तेव्हा आपल्या लोकांना फायदा होतो आणि परस्पर सहकार्याच्या नवीन आणि मोठ्या संधी निर्माण होतात. मी त्यांच्यासोबत काम करण्यास आणि आमची भागीदारी अभूतपूर्व उंचीवर नेण्यास उत्सुक आहे.


